राष्ट्रसंतांच्या जीवनावरील महानाट्य ‘‘क्रांतिनायक’’चे सादरीकरण

राष्ट्रसंतांच्या जीवनावरील महानाट्य ‘‘क्रांतिनायक’’चे सादरीकरण

0

सुनील इंदुवामन ठाकरे, बेलोरा: रंगभूमी क्रिएशन प्रा. लि. नागपूर प्रस्तुत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समग्र जीवनावर आधारित महानाट्य यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील बेलोरा या गावी झाले. ग्रामजयंतीनिमित्त हा या नाटकाचा 40 वा प्रयोग झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर ह्यांनी ‘‘क्रांतिनायक’’ या नाटकाचे उद्घाटन केले.

क्रांतिनायक हे महानाट्या राष्ट्रसंतांचं केवळ जीवनचरित्र ठरत नाही. सार्वकालिक संदेश देणारा हा एक नितांत सुंदर प्रयोग आहे. या नाटकाचे लेखक पुरुषोत्तम मिरासी यांनी राष्ट्रसंतांचं विचारदर्शन पूर्णपण देण्याच प्रयत्न केला आहे. निर्माता व दिग्दर्शक असलेले विलास कुबडे यांनी नाटकाच्या संहितेपासून तर अन्य सर्वच घटकांवर बारकाईने काम केल्याचे लक्षात येते. नाटकात अधूनमधून येणाऱ्या संगीत व नृत्यांनी नाटकाची रमणीयता व उंची दोन्ही वाढतात.

संगीताची बाजू विरेंद्र लाटणकर यांनी समर्थपणे सांभाळली. पारंपरिक लोकसंगीताचा अत्यंत प्रभावी वापर त्यांनी केला. निर्मिती सहाय्यक म्हणून वामन काचोळे ह्यांची बाजूदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. नृत्य दिग्दर्शक सतीश बगडे यांनी पोतराज, आदिवासी व अनेक लोकनृत्यांची उत्तम पेरणी केली आहे. नेपथ्य पांडुरंग वानखेडे यांनी सांभाळले. काही मर्यादा असाव्यात, एरवी नेपथ्यात आणखी बरंच काही करता आलं असतं. किशोर बत्ताशे यांनी प्रकाशव्यवस्था कौशल्याने सांभाळली. पोलीस स्टेशन जळतानाचा प्रसंग त्यांनी उत्तम प्रकाशव्यवस्थेतून जिवंत केला. लालजी श्रीवास यांनी केलेली रंगभूषा व श्यामला कुबडे यांची वेशभूषा कौतुकास पात्र आहे.

नाटकातील सर्व संवाद व संगीत पूर्वध्वनिमुद्रित होते. त्यामुळे संवादांची क्वॉलिटी व तंत्रविभागाने घेतलेल्या मेहनतीने नाटकाचं वजन सुरुवातीपासूनच कायम राहिले. प्रकाश देवा यांचा राष्ट्रसंतांसाठी वापरलेला आवाज, त्यातील खर्जा दाद देण्यासारखा होता. बाल माणिकाची भूमिका करणारा कबीर लखमापुरे, युवा माणिक यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला. रमेश लखमापुरे हे नाट्यक्षेत्रातील अत्यंत गाजलेलं नाव. त्यांच्या अभिनयात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बारीकसारीक छटा दिसत होत्या.

वऱ्हाडी बोलीत हे संपूर्ण नाटक अपेक्षित होतं. पण काही ठिकाणी प्रमाणभाषेतले संवाद वेशभूषा आणि पात्र बघता थोडे वेगळे जाणवत होते. वामन काचोळे, विलास कुबडे, अशोक गवळी, विश्वास पाटील, भास्कर मेश्राम, मिलिंद रामटेके, पांडुरंग वानखेडे, दिनेश चंदनकर, अभिषेक येल्लूरवार, कबीर, कपील हेडाऊ, नितीन पात्रीकर, अमीत सावरकर, बिस्मार्क भिवगडे, अपर्णा लखमापुरे, रत्ना कोल्हापुरे, श्यामला कुबडे, अश्विनी गोरले, मालती वराडे यांनी अत्यंत कौशल्यांने विविध भूमिका या महानाट्यात सांभाळल्यात.

नृत्याची टीम भन्नाट होती. लोकनृत्याचा संपूर्ण बाज या टीमने सांभाळला. करुणा मंगदे, यामिनी ढगे, कल्याणी बेहेरे, केतकी बेहेरे, जयश्री थूल, समृद्धी पात्रीकर, श्रीकांत घबडगावकर, अमित कुबडे, सतीश बगडे, अंकुश कान्होलकर, वैभव नक्षिणे, अक्षय भगत यांनी आपल्या नृत्यांनी नाटकाला भरीवपणा दिला. पडद्यामागील तंत्रज्ञ टीममधील लालजी श्रीवास, किशोर बत्तासे यांनी आपली कामगिरी चोख बजावली. एकंदरीत ‘‘क्रांतिनायक’’ हे महानाट्य बेलोरा येथील रसिकांच्या पसंतीस उतरले. या नाटकासाठी वणी, घुग्गूस, चंद्रपूर, पुनवट, पुरड पासून पंचक्रोशीतील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!