वणी (रवि ढुमणे): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येऊन वणीत 21 डिसेंबर ला कुणबी मूक महामोर्चाचे आयोजन कुणबी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्च्यात लाखीच्या संख्येनी कुणबी समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन कुणबी संघर्ष समिती ने केले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने 28 ऑक्टोबर 2014 रोजी अहवाल क्रमांक 49 शासनास सादर केला आहे. या अहवालाच्या यादीतून एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
मागासवर्ग आयोगाने जो प्रस्ताव सादर केला यात जाणीवपूर्वक कुणबी जातीचा समावेश केलेला नाही. कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. कुणब्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय शेती आहे. बिना पाण्याची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याइतपत पीकपाणी होते. मुलांचे शिक्षण, घरात मंगलकार्य आदी बाबीसाठी त्याला कर्जाचा आधार घ्यावा लागतो आहे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
यवतमाळ जिल्हा संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. शासनाचे कठोर निर्णय सुद्धा त्याचाच भाग आहे. घरात मुलांना उच्च शिक्षण द्यायला पैसे नाहीत. आणि इकडे शासन दडपशाही धोरण अवलंबित कुणबी जातीला शासनाच्या सोयीसुविधा पासून वंचित ठेवण्याचे प्रकार करीत आहे. शासनाने एकशे तीन जातींना यातून वगळून केवळ कुणबी जातीचा समावेश न करणे हा अन्यायच आहे. या निर्णयामुळे कुणब्यांच्या लेकरांना शिक्षण, नोकरी मिळविणे कठीण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने असंवैधानिक क्रिमिलेअर अट लादल्याने कुणबी समाज शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासापासून वंचित आहे. शासनाच्या या दडपशाही धोरणाच्या विरुद्ध एल्गार पुकारत शासनाने घातलेली अट त्वरित रद्द करावी यासाठी कुणबी संघर्ष समिती, वणी,झरी, मारेगाव तालुक्याच्या वतीने उद्या 21 डिसेंबर ला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून भव्य मूक महा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे.
वणी,झरी,मारेगाव तालुक्यातील कुणबी समाजातील प्रत्येक लोकांनी मागासवर्ग आयोगाच्या दडपशाही धोरणाच्या विरुद्ध काढण्यात येणाऱ्या कुणबी मूक महा मोर्च्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुणबी संघर्ष समिती ने केले आहे.
कुणबी समाजातील राजकीय नेत्यांनी कंबर कसायला हवी
वणी उपविभागात सर्वात जास्त संख्या असलेल्या कुणबी समाजातील लोक सर्वच क्षेत्रात आहे. निवडणूक, मोर्चे, मेळावे यासाठी हे राजकीय पक्षाचे नेते मोठ्या संख्येने जनसमुदाय गोळा करतात. आता कुणबी समाजातील राजकीय पुढाऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. समाजातील राजकीय नेत्यांनी जसे पक्षासाठी समुदाय गोळा करतात त्याप्रमाणे या कुणबी मूक महामोर्चातही आपला ठसा उमटविण्याची हीच खरी वेळ आहे. राजकीय हेवेदावे, राजकारण बाजूला सारून समाजाच्या रक्षणासाठी आता खरी कंबर कासण्याची वेळ आहे.
उपविभागातील गावागावातून ,तसेच कुणबी बांधवांच्या घराघरातून या मोर्च्यात उपस्थिती दाखवून “कुणबी कधी एकत्र येत नाही “हा शब्द खोडून टाकण्याची ही एकमेव संधी उपलब्ध झाली आहे. तेव्हा या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावून शासनाला कुणबी समाज एकत्र आहे हे दाखवून देण्यासाठी मोर्च्यात हजेरी लावणे गरजेचे आहे.