रासेयो शिबिरातून राष्ट्रप्रेमची भावना जागृत होते – लक्ष्मणराव भेदी

चिखलगाव येथे लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचा आरंभ

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रीय सेवायोजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमची भावना निर्माण होते. श्रमदान व समाजसेवा करीत असताना विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होते. रासेयो शिबीर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे. असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मणराव भेदी यांनी व्यक्त केले. शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे विशेष शिबिर दत्तक ग्राम चिखलगाव येथे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

सोमवार 7 मार्च रोजी आयोजित रासेयो शिबीर शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वावलंबन आणि समाजोपयोगित्व यांचे महत्त्व विशद केले. या प्रसंगी पंचायत समिती वणीचे सभापती संजय पिंपळशेंडे यांनी आपण संस्थेचे माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त करीत जनतेला प्रेरणा मिळावी असे कार्य विद्यार्थ्यांनी रासेयो शिबिराच्या माध्यमातून करावे असे आवाहन केले. श्रीमद्भागवतगीता श्लोकाच्या आधारे ‘कर्तव्य करावे फळाची अपेक्षा नको’ असे म्हणत रासेयो म्हणजे सुसंस्कृत,सभ्य सुजाण नागरिक बनविण्याची कार्यशाळा आहे. असे विचार संस्थेचे सहसचिव अशोकराव सोनटक्के यांनी व्यक्त केले. उपाध्यक्ष रमेश बोहरा यांनी विद्यार्थ्यांना संस्मरणीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मणराव भेदी तथा उपाध्यक्ष रमेश बोहरा, सहसचिव अशोक सोनटक्के, सदस्य उमापती कुचनकार, अनील जयस्वाल, प्रमोद देशमुख यांच्यासह वणी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, चिखलगावचे उपसरपंच अनील ताजणे, सदस्य अरुण झाडे इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. नीलिमा दवणे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. किसन घोगरे यांनी केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.