लाडकी बहिण म्हणजे रक्षाबंधनाची ओवाळणी – आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
लाडकी बहीण योजनेसाठी कार्य करणाऱ्यांचा सत्कार
बहुगुणी डेस्क, वणी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही एक अभिनव आणि महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनातील आर्थिक अडचणी कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना स्त्रियांच्या सन्मानासाठी आहे. रक्षाबंधनाला ही सरकारकडून बहिणीला दिलेली ओवाळणी आहे. असे प्रतिपादन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. ते शेतकरी मंदिर येथे बोलत होते. आज बुधवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता लाडकी बहिण योजनेसाठी कार्य करणा-या व्यक्तींचा सत्कार तसेच रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
आमदार बोदकुरवार पुढे म्हणाले की, सर्वांनी या योजनेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजूनही करीत आहेत. या देशात स्त्रिचा जन्म होणे ही भाग्याची गोष्ट आहे. ती शक्ती आणि देवीचे स्वरूप आहे. रक्षाबंधनाला फार महत्त्व आहे. हे रेशीम बंध खूप बळकट असतात. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायला हव्यात. हे सेवेचे व्रत आहे. आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत. सदैव लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहोत, असे वचन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी महायुती सरकारचे अभिनंदन केले. या चांगल्या कार्यात दिशाभूल करणारे अनेक समाजकंटक आहेत. बहिणींनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. हे बहिणींसाठी राखीचं गिफ्ट आहे. बहिणींना फॉर्म भरण्याकरता मदत अनेकांनी केली. त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे. हा एक कृतज्ञता सोहळा आहे. अशा अनेक योजना भविष्यातही येतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव महिलांचा सन्मान केला. तोच वारसा आपल्याला चालवायचा आहे. असे तारेंद्र बोर्डे म्हणाले.
योजना राबवण्यासाठी मदत करणा-यांचा सत्कार
लाडकी बहीण योजनेसाठी अत्यल्प कालावधी मिळाला. ही सर्वात लोकप्रिय योजना ठरल्याने महिलांची या योजनेचा लाभ घेण्यासाठी एकच झुंबळ उडाली. योजना सर्वांपर्यत पोहोचण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी व त्यांना मदत करणा-या विविध विभागाच्या कर्मचा-यांनी मोलाची भूमिका बजावली. या योजनेसाठी कार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आयसीआरपी बचत गट, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि विविध स्वयंसेवकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
बालविकास अधिकारी सुरेखा तुराणकर यांनी या योजनेचा थोडक्यात आढावा घेतला. गेल्या एक-दीड महिन्यांपासून हे कार्य अविरत सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. आतापर्यंत 30 हजार महिलांच्या खात्यात प्रत्यक्षात पैसे जमा झाले. उर्वरित बहिणींनी लवकरात लवकर अर्ज भरावे असे आवाहन त्यांनी केले. नगरपालिकेच्या प्रकल्पअधिकारी पौर्णिमा शिरभाते यांनी सांगितले की ९१३८ अर्ज वणी नगरपालिका क्षेत्रात केले. काम अजूनही सुरू आहे. या योजनेबद्दल सगळ्या बहिणी समाधानी आहेत. योजना आणि प्रकल्प सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. असे ही त्या म्हणाल्या.
माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला पावडे यांनी ही योजना लोकप्रिय असल्याचे सांगितले. अनेकांच्या खात्यात पैसेही जमा झालेत. खेळीमेळीच्या वातावरणात प्रामाणिकपणे सर्वांनी काम केलं. पैसे असले की आधार वाटतो. गेल्या दहा वर्षांपासून आमदारांची जनतेशी नाळ जुळली आहे. आता आपलं कुटुंब आणि गाव याचं रक्षण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी ललिता बोदकुरवार, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, गजानन विधाते, अशोक सुर, श्रीकांत पोटदुखे, संध्या अवताडे, लिशा विधाते, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष तुकाराम माथनकर , बंडु भाऊ चांदेकर, राकेश बुग्गेवार, संदिप बेसरकर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिंपळेशेंडे यांनी केले. संचालन स्मिता नांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली होती.
Comments are closed.