बहुगुणी डेस्क, वणी: शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख ललित लांजेवार यांच्या मृत्यू प्रकरणी आता शहरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. त्यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. वणी पोलीस ठाण्यातील एका कर्मचा-याने धमकी दिल्यामुळेच ललित लांजेवार यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले, असा गंभीर आरोप ललित लांजेवार यांच्या पत्नी श्रीरंगी लांजेवार यांनी केला. याबाबत शनिवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी त्यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. दरम्यान गुरुवारी मंत्री संजय राठोड हे लांजेवार कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती ललित यांच्या मित्रपरिवाराने दिली आहे.
काय आहे धमकीचे प्रकरण?
एका वृत्तपत्रात वणी पोलीस स्टेशनचा हवालदार बनला रेती माफिया अशा मथळ्याखाली एक वृत्त प्रकाशित झाले होते. या बातमीत पोलीस ठाण्यातील तीन कर्मचा-यांचा उल्लेख होता. दिनांक 24 जानेवारीला या बातमीचे कात्रन ललित लांजेवार यांनी व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपवर शेअर केली होती. त्यानंतर संबंधीत हवालदाराने एसडीओ कार्यालयाजवळ तू माझे काहीच करू शकत नाही, तुला खोट्या गुन्ह्यात मी फसवतो, अशी धमकी दिल्याचा आरोप श्रीरंगी लांजेवार यांनी तक्रारीतून केला आहे.
या धमकीनंतर ललित तणावात आला होता. ललित यांनी त्यांचे मित्र विनोद मोहितकर तसेच महेश कुचेवार यांच्याकडे याबाबत चर्चा केली होती. ललितने स्वतःच्या लेटरहेडवर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे तक्रारही केली होती. धमकीनंतर ललित तणावात होते, त्यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले, असा आरोप तक्रारीतून केला आहे. ललित लांजेवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी रेस्ट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पक्षातील तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रेती तस्करीची चौकशीची मागणी
ललित यांच्या मृत्यू प्रकरणी रेती तस्करीचा ऍन्गल समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. तसेच कर्मचा-यांवर लावण्यात आलेला रेती तस्करीच्या आरोपात किती तथ्य आहे याची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनेच्या पदाधिका-यांद्वारे करण्यात येत आहे.
Comments are closed.