लालपुलीया परिसरातील अनाधिकृत कोळसा डेपो हटवा

राष्ट्रवादी काँग्रेसचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन;  14 मार्च रोजी कोळसा वाहतूक ठप्प करण्याचा इशारा

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगतच्या चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीत लालपुलिया परिसरात अस्तित्वात असलेले खाजगी कोळसा डेपोमुळे प्रदूषणाचा मुद्दा एकदा पुन्हा चर्चेत आला आहे. वणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वणी यवतमाळ मार्गावरील सर्व अनाधिकृत कोळसा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे. कोळसा प्लॉटवर कोळसा लोडिंग अनलोडिंग दरम्यान बारीक भुकटी हवेत पसरून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. कोळसा प्रदूषणामुळे चिखलगाव येथील जनता प्रचंड कंटाळली आहे. त्यामुळे येत्या 14 मार्च रोजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे कोळसा वाहतूक बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वेकोलिच्या तसेच खाजगी कोळसा खाणींमधून ट्रकद्वारे आलेला कोळसा साठवून इथून राज्यातील व परप्रांतातील विविध उद्योगांना विक्री करण्यात येतो. त्यामुळे लालपुलिया परिसरात दररोज कोळशाची शेकडो वाहने उभी असतात. ही वाहने कोळसा भरून तेथून निघून जातात. दरम्यान खाणीतून कोळसा आणताना आणि तो पुन्हा दुसऱ्या वाहनांत भरताना कोळशाची भुकटी उडते. ती हवेत पसरते. त्यातून दररोज प्रदूषणात सातत्याने भर पडत आहे. हवेत प्रदूषणमुळे चिखलगाव येथील शेकडो नागरिकांना दमा, किडनी व फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार असे अनेक दुर्धर आजार जडल्याचे आरोप राकाप जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केला आहे.

कोळशाच्या वाहतुकीबाबत अनेक नियमांचे पालन करावे लागतात. पण या कोल डेपोमध्ये नियम धाब्यावर बसवून कोळसा वाहतूक होत आहे. त्यामुळं या भागात मोठ्या प्रमाणात धूळ आणि प्रदूषणाची समस्या आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. त्यामुळे लालपुलिया परिसरात असलेले अनधिकृत कोळसा डेपो येत्या 7 दिवसात हटविण्यात यावे. अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे , जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, राजु डावे, कर्मा तेलंग, वैशाली तायडे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, शहर उपाध्यक्ष रामकृष्ण वैद्य, विद्यार्थी शाखा तालुकाध्यक्ष प्रणय बलकी, शहराध्यक्ष संदेश तिखट, चिखलगाव ग्रा.प.सदस्य अजुंम शेख, संगीता वानखेडे, सुनीता कातकडे,  वैशाली लिहीतकर, रियाज शेख उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.