वणी(रवि ढुमणे): शहरालगत असलेल्या लालपुलिया परिसरातील कोळसा डेपो पूर्ववत सुरू झाले आहे. प्रदूषणाच्या भस्मासुराचा मुद्दा शासकीय स्तरावर गाजत असतांना प्रशासनाने चुप्पी साधत जणू कोळसा टाकायला मुकसंमती दिली असल्याचे दिसायला लागले आहे. कोळसा डेपो सुरू करायला नेमकी परवानगी कुणाची हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. लालपुलियातील या कोळसा बाजारात येणारी वाहने भर रस्त्यावर उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.
चिखलगाव ग्रामपंचतीच्या हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात असंख्य नियमबाह्य कोळसा डेपो थाटले आहेत. या कोळसा डेपोतून निघणाऱ्या कोळशाच्या धुळीने प्रदूषणात वाढ झाली आहे. मागील काळात या कोळसा डेपोची पाहणी करून सदर डेपो हलविण्याचा हालचाली सुरू झाल्या होत्या. अनेकांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती. माशी कुठे शिंकली कोण जाणे? कोळसा डेपो हटविण्याच्या हालचाली थंड झाल्या. वारंवार वृत्त प्रकाशित करण्यात आले. तितक्याच प्रशासनाने हालचाली केल्या. परंतु त्यांनतर जणू फाईलच बंद झाली.
आज घडीला दररोज लाखो टन कोळशाची उलाढाल या लालपुलियातील बाजारपेठेत होते. वाहनातून कोळसा उतरविणे आणि वाहनात कोळसा भरणे या मोठ्या प्रमाणात कोळश्याची धूळ हवेत मिसळून प्रदूषण होत आहे. शासनाने डेपो बंद करण्यासाठी हालचाली करीत उपविभागीय अधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी सूचना केल्या होत्या मात्र उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल कोणता सादर केला हे अस्पष्ट आहे. परिणामी लालपुलियातील कोळसा डेपो पुन्हा सुरू झाले आहे. डेपोधारकांनी प्रदूषण नियंत्रक मंडळ, तलाठी, ग्रामपंचायत, तहसीलदार यांचे नाहरकत प्रमाणपत्र सादर केले की मनमानी करीत डेपो थाटले हे अद्याप गुलदस्त्यात आहे. एकूणच नियमबाह्य असलेले लालपुलियातील कोळसा डेपो सुरू झाल्याने सममन्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोळसा डेपोला प्रशासनाची मुकसंमती?
लालपुलियातील कोळसा डेपो हटविण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या अर्थपूर्ण दुर्लक्षित धोरणामुळे कोळसा डेपो जागच्या जागी राहिले. शासनस्तरावर डेपो हटविण्याचे प्रयत्न झाले मात्र प्रशासनाची डेपो धारकांना जणू मुकसंमती मिळाली असल्याने डेपो पूर्ववत सुरू झाले.