जितेंद्र कोठारी, वणी : शेतीची मोजणीसाठी शेतकऱ्याकडून 10 हजाराची लाच घेताना वणी येथील भूमीअभिलेख विभागाच्या भूमापक कर्मचाऱ्याला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ अटक केली. नांदेपेरा मार्गावरील एका हॉटेलमध्ये रविवार 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. के.एम कवडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार यांची तालुक्यातील पुरड (नेरड)येथे शेती आहे. शेतीची मोजणीसाठी आवश्यक शुल्क भरुनही भूमापक के.एम कवडे हा मागील एका वर्षापासून त्रुटी दाखवून मोजणीसाठी 12 हजार रुपये लाचेची मागणी करीत होता. तडजोडीनंतर आरोपी 10 हजार घेण्यास तयार झाला. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी यवतमाळ लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची खात्री करून सापळा रचला. रविवार 26 फेब्रुवारी रोजी शेतीची मोजणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी भूमापककडून मोजणीशीट घेऊन पैसे देण्यासाठी नांदेपेरा मार्गावर एका हॉटेलमध्ये जेवण्याच्या निमित्ताने बोलाविले. हॉटेलमध्ये बसून तक्रारदार यांनी आरोपीला 10 हजार रुपये दिले त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी हॉटेलच्या बाहेर येऊन तीन वेळा डोक्यावरून हात फिरविला. ठरलेला इशारा मिळताच हॉटेलच्या बाहेर सापळा रचून उभे असलेले अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये प्रवेश करून झडप घालून लाचखोर भुमापकाला ताब्यात घेतला.
ताब्यातील आरोपीला घेऊन लाचलुचपत विभागाचे अधिकारी वणी पोलीस ठाण्यात पोहचले. रात्री उशिरापर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कारवाई अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अरुण सावंत, देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (ला.लु.प्र.वि. यवतमाळ) ज्ञानेश्वर नालट, पोलीस अंमलदार सचिन भोयर, अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, राकेश सावसाकडे, महेश वाकोडे, चालक संजय कांबळे यांनी केली.
नागरीकांना आवाहन
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे खालील नंबरवर संपर्क साधावा.
दुरध्वनी क्रं – 07232-244002
टोल फ्रि क्रं 1064
मोबाईल क्र. 9657717329
Comments are closed.