सुशील ओझा, झरी: कोव्हिड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने महाराष्ट्रातील जनतेला कोरोना विषाणू पासून बचाव करण्याच्या उद्देशाने “माझं कुटुंब माझं गाव” या उपक्रमातून जनजागृती करण्याचे आदेश पारित केले आहे. सदर उपक्रमात आरोग्य विभाग, महसूल पोलीस व पंचायत समिती विभागांना पुढाकार घेऊन शासनाच्या दिलेल्या पद्धतीने जनजागृती करायचे आहे. याच अनुषंगाने 16 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता तहसील कार्यालयाच्या सभागृहात या उपक्रमाचा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमात आमदार यांच्यासह तहसीलदार गिरीश जोशी, गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम, नगरपंचायत सीईओ माकोडे, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, गोल्हर, मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने, पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे, पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, संजय पिंपळशेंडे, भाजप तालुकाध्यक्ष सतीश नाकले, स्वीकृत सदस्य अंकुश लेंडे, माजी पं.स सुरेश मानकर तालुक्यातील आशा वर्कर सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार बोदकुरवार यांनी विविध विभागाला सूचना देत गावक-यांमध्ये जनजागृती करण्यास सांगितले.
आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावरच – आ. बोदकुरवार
आपापल्या कुटुंबातील लहान मुलासह घरातील वयोवृद्ध सर्वांची काळजी घरातच घ्यावी. घरातील लहान मुलांना विनाकामे घराच्या बाहेर जाऊ देऊ नये, तोंडावर मास्क बांधून रहावे, सैनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नये, सोशल डिस्टनसिंग ठेवावे, कोरोना बाबत गावपातळीवर राजकारण करू नये, दक्षता समितीने गावात जनजागृती करावे.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार वणी विधानसभा क्षेत्र
डॉक्टर तुमचा जीव वाचवण्यासाठी आहेत – डॉ, मोहन गेडाम
सोशल मीडिया व गावात डॉक्टर हे दीड लाखाच्या अनुदानाकरिता रुग्णांचे जीव घेत आहे किंवा शासनाकडून बोगस रुग्ण दाखविल्या जात आहे. अशा कोणत्याही अफवांवर जनतेनी विश्वास ठेवू नये. डॉक्टर कोणतेही खोटे रिपोट तयार करून किंवा पोजिटिव्ह असल्याचे सांगून कुणालाही कोविड सेंटरमध्ये नेत नाही. आशा बोगस अफवांवर सुद्धा जनतेनी लक्ष देऊ नये. आपली तपासणी करून घ्यावी जेणे करून आपल्या सुरक्षेसाठी योग्य पाऊल उचलता येईल.
– डॉ मोहन गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी
कोरोना जनजागृती व तपासणीत सर्वांत पुढे आशा वर्कर व अंगणवाडी सेविका आहेत. आपले जीव धोक्यात टाकून घरोघरी फिरून तपासणी व माहिती घेत आहेत. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे रुग्णाची माहिती मिळत आहे. त्यांच्या कार्याची उपस्थितांनी प्रशांसा केली. तालुक्यातील प्रत्येक गावातील व्यक्तीने आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)