महिला सक्षमीकरणासाठी पतसंस्थांनी पुढाकार घ्यावा: यशोमती ठाकूर

लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे थाटात उद्घाटन

निकेश जिलठे, वणी: बचत गट हे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. महिला सक्षमीकरणात बचत गटाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे बचत गटांना कर्ज देऊन पतसंस्थेने महिला सक्षमीकरणासाठी हातभार लावावा असे आवाहन महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. शनिवारी शेतकरी मंदिर येथे लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. बाळू धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून वामनराव कासावार, आ. प्रतिभा धानोरकर, वामनराव चटप, टिकाराम कोंगरे, वसंत घुईखेडकर, संजय देरकर, अरुणा खंडाळकर, प्रदीप बोनगीरवार, नरेंद्र ठाकरे, वंदना आवारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

उद्घाटनपर भाषणात बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की पतसंस्थेच्या अध्यक्षा या महिला असल्याने त्यांनी केवळ अध्यक्षपद न भूषवता महिलांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. परिसरात कुमारी मातांचा मोठा प्रश्न आहे. कुमारी मातांना स्वावलंबी बनवण्यासाठीही पतसंस्थेने मदत करावी. त्यांना सवलतीत व कमी दरात कर्ज द्यावे असे आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले.

केंद्र सरकारवर घाणाघात
यशोमती ठाकूर यांनी महागाई, बेरोजगारी यावर चांगलेच आसूड ओढले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयांची किंमत खाली गेली आहे. बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. महागाईने सर्वसामान्य पिसला जात आहे. केंद्र सरकारने केलेले सर्वच वादे खोटे निघाले असून कल्याणकारी योजनांवर भर देण्याऐवजी केंद्र सरकार हे सुडाचे राजकारण करीत असल्याचा घाणाघातही त्यांनी यावेळी केला. प्रत्येक नागरिकांनी महापुरुषांचा इतिहास तसेच संविधान वाचण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खाडे यांनी केले. रंगनाथ स्वामी अर्बन निधी या पतसंस्थेच्या यशस्वी घोडदौड नंतर आता महिलांसाठी विशेष अशी पतसंस्था आम्ही सुरू केली आहे. सहकार क्षेत्र हे सर्वांगीन विकासाचा मार्ग असून संपूर्ण विदर्भात पतसंस्थेची स्थापना करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाआधी दुपारी 11.30 वाजता टागोर चौकातील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संजय खाडे यांनी उपस्थित मान्यवरांना संस्थेबाबत माहिती दिली. दुपारी 1 वाजता शेतकरी मंदिरात कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतसंस्थेची संचालक मंडळ व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.