गुटका तस्करीचा मोठा पर्दाफाश; 66 लाखांचा मुद्देमाल जप्त
सापळा रचून तेलंगणाहून येणारी गुटका वाहतूक उधळली
बहुगुणी डेस्क वणी: यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या अवैध गुटका तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय गुटका तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन इसमांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित पानमसाला व तंबाखू असा एकूण 65 लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खास खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले होते. त्यानुसार दि. 27 डिसेंबर 2025 रोजी तेलंगणा राज्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 मार्गे पांढरकवडा दिशेने अवैध गुटका वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महामार्गावरील ढोकी गावापुढे सापळा रचून आयशर वाहन (क्रमांक UP-94-AT-2305) ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 180 पोती सुगंधित पानमसाला व तंबाखू (किंमत ₹45,92,000), एक मोबाईल फोन (₹6,000) तसेच आयशर वाहन (₹20,00,000) असा एकूण ₹65,98,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
याप्रकरणी वाहन चालक मोहन सियाराम यादव (वय 26) व क्लिनर बुध्दा बाबुसिंग परीयार (वय 35), दोघेही मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी, यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे सुरू आहे.



Comments are closed.