अवैध दारू तस्करी विरुद्ध कार्यवाही, 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन ठिकाणी कार्यवाही, मुख्य आरोपी बारचा मालक फरार

0

जितेंद्र कोठारी, वणी: एलसीबी पथकाने वणी भालर मार्गावर चंद्रपूरला जाण्याच्या तयारीत असलेली अवैध दारू जप्त केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर एका प्रकरणातील मुख्य आरोपी दारू जप्त झाल्याची माहिती मिळताच फरार झाला आहे. ही दारू भालर रोडवरील एका बारमधून चंद्रपूरला पाठवली जाणार होती.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार एलसीबी पथक शनिवारी दि. 7 जुलै रोजी सकाळी वणी शहर परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी खबरीने भालर रोडवरून चंद्रपूरला दारू पाठवली जाणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने भालर रोड गाठून हनुमान मंदिरा जवळ सापळा रचला. यावेळी भालरकडे जात असलेली इंडिका कार (MH29 L 388) या वाहनाची झडती घेतली असता इंडिका कारच्या डिक्कीमध्ये ऑफिसर च्वाईस ब्लू कंपनीचे विदेशी दारूने भरलेले चार बॉक्स आढळले.

पथकाने इंडिकाचे चालक प्रणय मारोतीराव वाढई वय 25 वर्ष, रा. तैलीफैल वणी याला अटक करून त्याच्याकडून 25,340 रुपयांची दारू व 80 हजारांची कार असा एकूण 1,05340/- रु.चा मुद्देमाल जप्त केला.

दुसऱ्या कार्यवाहीत एलसीबी पथकाने भालर मार्ग येथील एमआईडीसी मधील गजानन फर्निचर जवळ उभ्या असलेल्या बोलेरो वाहनातून 47,500 रु. किमतीचे 19 देशी दारूचे बॉक्स जप्त करून बोलेरो चालक अमोल शंकर तेलंग वय २८ वर्ष, रा. प्रगतीनगर वणी व त्याचे साथीदार विजय परशराम राठोड वय ३७ वर्ष, रा. देशमुखवाडी वणी याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता सदर अवैध दारू भालर रोडवरील डीडी बारचा मालक धीरज देवडे हा अवैध विक्रीसाठी चंद्रपूर येथे पाठवीत असल्याचे कबूल केले.

एलसीबी पथकाने दोन्ही कार्यवाहीतील तीन आरोपींना अटक करून दोन वाहनासह 1 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दारू तस्करीचा मुख्य आरोपी डीडी बारचा मालक धीरज देवडे हा फरार झाला आहे. स्थानिक गुन्हा शाखा यवतमाळचे ना.पो.का. गजानन डोंगरे यांचे तक्रारीवरून वणी पो.स्टे. मध्ये सदर आरोपी विरुद्द महा. दारूबंदी कायदा कलम 65 (ई) व प्रो. अक्ट 82, 83 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही पो. अधीक्षक एम. राजकुमार, स्था. गुन्हे शाखा प्रमुख पो.नि. मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहा. उपनिरीक्षक भीमराव शिरसाट, पो.का. गजानन डोंगरे, महेश पांडे व किशोर घोडेकर यांनी पार पडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.