सुशील ओझा, झरी: यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने मुकूटबन येथे ऑनलाइन सुरू असलेल्या जुगारावर छापा मारून 2 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करून 7 तरुणांना अटक केली.
तालुक्यातील मुकूटबन येथे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे ऑनलाईन लॉटरीचे दुकान सुरू आहे. सदर लॉटरी दुकानात ऑनलाईन जुगार सुरू असल्याची माहिती यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून एलसीबी पथकाने 8 जून रोजी 4.30 वाजता दरम्यान ऑनलाईन लॉटरी दुकानावर छापा मारला असता तिथून ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकऱणी दुकान चालकासह सहा तरुणांना अटक करण्यात आली. दुकानातील 4 कॉम्प्युटर 7 मोबाईल व 5060 रुपये नगदी असा एकूण 2 लाख 83 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुकूटबन येथील सुरेश घुमलवार, गणेश पचारे, सुनील निब्रड, सुहास टोंगे, शंकर मार्लेवार, गणेश खामनकर व अडेगाव येथील हरिदास कामतवार या तरुणांना अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
सदर कार्यवाही पीएसआय श्रीकांत जिंदमवार सह उल्हास कुरकुटे, गजानन डोंगरे, कबिश पानेकर, किशोर झेंडकर व नितीन मडसे यांनी केली असून प्रकरणाचा तपास महिला जमादार रंजना सोयाम करीत आहे.