मार्डी – कुंभा परिसराकडे नेत्यांसोबतच प्रशासनाचेही दुर्लक्ष

मुख्य रस्त्यांसोबतच अनेक समस्या, सर्वसामान्य हैराण

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील राजकीय दृष्टया अतिशय प्रगत, तालुक्याचे राजकारण स्वतःभोवती केंद्रित करण्याची क्षमता असलेल्या मार्डी परिसराकडे राजकीय नेत्यांसोबतच प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे हा परिसर राजकीयदृष्ट्या विकसित असला तरी प्रत्यक्षात विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र मारेगाव तालुक्यातील मार्डी परिसरामध्ये दिसत आहे.

मार्डी परिसरामध्ये असलेल्या आणि मार्डीच्या राजकारणावर ठसा उमटवणारे दोन गाव म्हणजे चोपण आणि हिवरा. परंतु या दोन्ही गावांची रस्त्यांची परिस्थिती बघितली तर या गावांमध्ये कोणते प्रभावी राजकीय नेतेच नसल्याचा भास होतो. खरे पाहता या दोन्ही गावांमध्ये राजकीय नेते उतू जाण्या इतपत भरून आहे. परंतु या दोन्ही गावातील रस्त्यांची अवस्था जर बघितली तर येथे अजूनपर्यंत रस्ता बनला की नाही असा संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.

मार्डी परिसरातील बोदाड-केगाव हा रस्ता, साधारण गाडेगाव रस्ता, चनोडा – शिवणी रस्ता, हिवरा ते मुकटा रस्ता, हिवरा ते दांडगाव रस्ता शिवणी रस्ता, मार्डी ते देवाळा – सिंधी रस्ता, पिसगांव ते पहापळ रस्ता, कुंभा ते मार्डी रस्ता, कुंभा ते बोरी – खैरी रस्ता, तसेच कुंभा या गावावरून जाणारे इतर गावांना जाणारे रस्ते या सर्वांचा विचार करता या परिसरातील राजकीय उदासीनता म्हणावी की, मोठे नेते जाणूनबुजून या परिसराच्या विकासाच्या आड येतात हे मात्र समजण्यापलीकडे आहे.

एरवी याच गावातील नेत्यांच्या म्हणण्याप्रमाणे तालुक्याचे 80 टक्के राजकारण होत असते. मग विकासाच्याच बाबतीत नेमके कोणते घोडे अडते हे या परिसरातील जनतेला पडलेले कोडेच आहे. रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर येत आहे. रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकदा छोटे अपघात घडले. अनेकांचे आर्थिक नुकसानही झाले. या नुकसानीला आणि अपघाताला जबाबदार कोण? हा प्रश्नही अनुत्तरीत आहे.

हे नेतेही याच रस्त्याने गाडी उडवत जातात. पण या परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी मात्र कोणीही आंदोलन केल्याचे ऐकीवात नाही. किंवा पुढाकार घेऊन रस्ते चांगले व्हावे असे वाटत नसल्याची शोकांतिका परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहे.

 

Comments are closed.