सुशील ओझा, झरी: विश्वरत्न बाबासाहेबांनी जो लढा पुकारला होता तो निराळाच होता. हा लढा त्यांनी त्यांच्या कर्तृत्त्वाने आणि ज्ञानाने लढला. ज्ञान मिळविण्यासाठी वाचन आवश्यक आहे. खेड्या-पाड्यांपर्यंत ही वाचनसंस्कृती पोहचावी म्हणून हे वाचनालय सुरू झाले आहे. आपल्यालादेखील आता ज्ञानाच्या बळावरच लढावे लागणार आहे. असे प्रतिपादन सामाजिक कायकर्ते तथा राष्ट्वादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणिस डॉ. महेंद्र लोढा यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त वाचनालयाचे उद्घाटन झाले. या वाचनालयाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी झरीचे विस्तार अधिकारी देवतळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण हिवरकर (सरपंच), अशोक पा उरकुडे(पो,पा), सिंधुताई टेकाम (उपसरपंच) हे होते.
उद्घाटम प्रसंगी बोलताना डॉ. लोढा म्हणाले की, आपण अनेक बाबींवर खर्च करतो. पुस्तकांवर गुंतवणूक करीत नाहीत. प्रत्येक घरात एक पुस्तकाचे कपाट असलेच पाहिजे. ज्यांना मुळीच शक्य नसेल त्यांनी किमान वाचनालयात येऊन नियमित वाचन केले पाहिजे. डॉ. लोढा म्हणाले की, वाचनाने एकेक पिढी घडत असते. युवकांबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली.
झरी तालुक्यातील अडेगाव हे लहानसं गाव आहे. या गावात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या जास्त आहे. तरुणाई म्हणजे ऊर्जा असते. ही ऊर्जा निरर्थक वाया जात होती. वैफल्यग्रस्त व नैराश्याने ग्रासलेल्या युवकांची ही अवस्था कुठूनतरी डॉ. लोढा यांना कळली. त्यांना जाण होती, की तरुणाई ही मातीच्या गोळ्यासारखी असते. त्यांना जसा आकार द्यावा तशी ती घडेल. मग या तरुणाईला दिशा देण्याकरिता वाचनालय उभे व्हावे हे डॉ. लोढा यांना अगदी आतून वाटले. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून येथे वाचनालय सुरू करण्याचा ध्यास घेतला. या तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिकादेखील असावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केलेत.
गावातील युवकांना ते भेटले त्यांच्यासोबत अनेकदा बैठकी घेऊन चर्चा केल्यात. डॉ. लोढा यांनी सर्वतोपरी मदत केली. त्यांच्या प्रयत्नातून वाचनालय उभे राहिले. ज्या महामानवाने वाचनाची व ज्ञानप्राप्तीची प्रेरणा विश्वाला दिली, त्या महामानवाच्या जयंतीला वाचनालयाचे उद्घाटन करण्याचे ठरले. म्हणूनच विश्वरत्न बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या पहिल्या 150 पुस्तकांसह वाचनालयाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते झाले.
स्पर्धापरीक्षा देणा-यांसाठी बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, एम.पी.एस.सी. अशा विविध अभ्यासक्रमांची पुस्तकेदेखील उपलब्ध करून देण्यता आली. विविध मासिके व पुस्तकांसह हे वाचनालय सकळी सात ते रात्री नऊ पर्यंत खुले राहणार आहे. या वाचनालयाचा लाभ घेण्याची विनंती डॉ. लोढा व अडेगाववासीयांनी केली आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भास्कर सूर, गोविंदा उरकुडे, अशोक पानघाटे, छत्रपती काटकर, राशीलताई पायताडे, छायाताई भोयर, वर्षाताई पाल, ज्योतीताई ठेंगणे, वाढई, यांच्यासह दिलीप नगराळे, देवतळे सर, राजू करमरकर, सुमित करमरकर, छत्रपती काटकर, प्रणय पाझारे, जयपाल नगराळे, धोंगले सर, गंगाधर वनकर, दिलीप करमरकर, काशीनाथ काटकर यांनी परिश्रम घेतले.