दोन जणांचा जीव घेणारा ‘तो’ खुनी खड्डा बुजवण्यास सुरुवात…
लोकवर्गणी व श्रमदानातून कामाला सुरूवात, गोकुळनगरचे रहिवाशांचा समाजापुढे आदर्श
जितेंद्र कोठारी, वणी: ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीचा प्रत्यय वणीतील गोकुळ नगर परिसरात आला आहे. दोन निष्पाप जणांना जीव घेणारा ‘तो’ खड्डा अखेर बुजवण्यासाठी अखेर गोकुळनगरवासी एकत्र आले व लोकवर्गणी व श्रमदानातून त्यांनी खड्डा बुजवण्याचे काम करण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी 8 नोव्हेंबरपासून या कामाला सुरूवात झाली असून आणखी दोन ते तीन दिवस हे काम पूर्ण करण्यास लागू शकतात. दरम्यान दानशूर पुढे आले व प्रशासनाने मदत केल्यास या खुनी खड्ड्याच्या ठिकाणी एक सुंदर बगिचा तयार करण्याचा मानस गोकुळ नगर वासियांनी व्यक्त केला आहे.
शहराच्या दक्षिन भागात असलेल्या जत्रा मैदान जवळ गोकुळ नगर ही वस्ती आहे. गोरगरीब, मजूर व दुधाचा व्यवसाय करणा-यांची वस्ती म्हणून या परिसराची ओळख आहे. या परिसरातील मागील भागात अनेक वर्षापासून एक मोठा खड्डा आहे. दरवर्षी पावसाळ्यात तेथे मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे या खड्ड्याला एका तळ्याचे स्वरूप आले. दोन महिन्याआधी या खड्ड्यात पडून एका 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ही घटना संपूर्ण शहरवासीयांच्या मनाला चटका लावून गेली.
या घटनेनंतर काही दिवस लोटत नाही तर आणखी एका 40 वर्षीय इसमाचा या खड़्ड्यात पडून मृत्यू झाला. पाठोपाठ झालेल्या 2 मृ्त्यूमुळे हा खड्डा ‘खुनी’ खड्डा म्हणून ओळखला जाऊ लागला. गोकुळनगर येथील रहिवाशांनी हा खड्डा बुजवण्यासाठी नगरपालिकेला वारंवार निवेदन दिले. तत्कालिन मुख्याधिकारी यांनी खड्ड्याला कुंपण करून द्यायचे आश्वासन दिले, मात्र ते आश्वासन कधीही पूर्ण झाले नाही.
दोन जिवांना गिळंकृत करणा-या या खुनी खड्ड्याची समस्या अखेर स्वत:च सोडवायची, असा निश्चय परिसरातील नागरिकांनी केला. यासाठी परिसरातील काही व्यक्ती व तरुणांनी पुढाकार घेतला. परिसरातून लोकवर्गणी गोळा केली गेली. गोकुळ नगर हा परिसर गोरगरीब मजुरांची वस्ती आहे. दिवाळीनंतर स्वत:च श्रमदान करून खड्ड्यातील पाणी उपसणे व त्यानंतर तारेचे कुंपण करण्याचे ठरले. अखेर सोमवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी या कामाला सुरवात झाली.
गेल्या तीन दिवसांपासून गोकुळ नगर येथील रहिवाशी या जीवघेण्या खड्ड्यातील पाणी काढण्याचे काम करीत आहे. खड्डा प्रचंड खोल आणि मोठा असल्याने आणखी दोन दिवस हे काम चालणार आहे. त्यानंतर तारेचे कुंपण टाकण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे. परिसरातील महिला देखील त्यांना मदत करण्यात मागे नाही.
बगिचा बनवण्याचा मानस – तुळशीराम काकडे
आणखी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही श्रमदानातून खड्डा बुजवण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. गोकुळ नगर ही गरीब लोकांची वस्ती आहे. संपूर्ण खड्डा भरण्याचा खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे खड्डा न बुजवता या ठिकाणी आम्ही तारेचे कुंपण टाकण्याचे ठरवले आहे. जर प्रशासनाने मदत केली किंवा कुणी दानशूर व्यक्ती पुढे आल्यास खड्डा बुजवून त्या ठिकाणी एक सुंदर बगिचा तयार करण्याची आमचा मानस आहे. बगिचा झाल्यास खुनी खड्ड्याची ओळख मिटून तिथे एक स्मारक तयार होईल.
– तुळशीराम काकडे, स्थानिक रहिवाशी
सदर कामासाठी तुलशिराम काकडे, मुन्ना मोरे, गोलु धुमाल, मंगेश भोयर, अरूण शिंदे, विजय मोरे, लखन वाघडकर, नरेश बकाले, गणेश भोयर, सतीश पोटे, अर्जून गदाईकर, गणेश भगाडे हे अहोरात्र परिश्रम घेत आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. मात्र एवढे असूनही गोकुळ नगर येथील रहिवाशी हिम्मत मात्र खचले नाही. त्यांनी एकत्र येत लोकवर्गणी व श्रमदानातून ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीचा प्रत्यय आणून समाजापूढे एक आदर्श ठेवला आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.