कांद्याची निर्यात बंदी उठवा, काँग्रेसचे निवेदन
केंद्र सरकारचा निर्णय शेतकरी विरोधी असल्याचा आरोप
विवेक तोटेवार, वणी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. हा मुद्दा उचलून धरत काँग्रेसतर्फे राज्यभरात आज आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी दिनांक 16 सप्टेंबर रोजी वणीत काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमोद निकुरे व भास्कर गोरे उपस्थित होते.
राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या वाढता उत्पादन खर्च व काढणी पश्चात संपुष्टात आलेली टिकवणक्षमता या अडचणीत पूर्ण भरडला गेला आहे. त्यात कांदा उत्पादन खर्चाच्याही खाली विकला गेला. अलीकडे त्यास रास्त दर मिळण्यास प्रारंभ झालेला असतानाच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने निर्यातबंदीचा घाट घटल्याने याचे सर्वत्र पडसाद उमटले आहे.
काँग्रेसने निवेदन देत निर्यातबंदीला कडाडून विरोध केला आहे. आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या असल्याने केंद्र सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना संकटात टाकू नये. तसेच कांद्यावरील निर्यात बंदी लवकरात लवकर मागे घ्यावी. अशी मागणी वणी शहर, वणी तालुका, काँग्रेस सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस यांच्या वतीने शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, भास्कर गोरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली.
शेतक-यांचे कंबरडे मोडणारा निर्णय़ – प्रमोद निकुरे
आज कांद्याला थोडा भाव मिळत आहे म्हणून केंद्र सरकारच्या पोटात दुखत आहे. शेतकऱ्यांचा पूर्ण हंगाम वाया गेला आहे. फक्त 2 ते 4 रुपये किलो भाव मिळत होता. या भावाने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. पुढे भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला. पण तो कांदाही सडत आहे. शेतक-यांकडे जो थोडाफार कांदा शिल्लक राहिलाय. त्याला आता समाधानकारक दर मिळतोय. पण निर्यात बंदीमुळे आता शेतक-यांचा खर्चही भरून निघणार नाही.
– प्रमोद निकुरे, शहर अध्यक्ष काँग्रेस
(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)