पत्नी माहेरी गेल्याचा राग… जावयाचा सासऱ्यावर कु-हाडीने हल्ला

सासरा गंभीर जखमी, जावयाविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: हुंड्यासाठी सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी गेली. मात्र या रागातून जावयाने सासऱ्यावर कु-हाडीने क्रूर हल्ला करून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना झरी तालुक्यातील अडेगाव येथे गुरुवारी, 4 सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी जावयावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सास-याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी (वय 30) हिचे 2016 मध्ये चिखली (ता. वणी) येथील अनिल नामक एका तरुणाशी लग्न झाले. त्यांना दोन अपत्ये असून, पती अनिल हा पत्नीला वारंवार माहेरी पैसे आणण्यासाठी दबाव टाकतो. तिला मारहाण करतो. या त्रासाला कंटाळून त्यांची मुलगी 15 दिवसांपूर्वी माहेरी आली होती आणि तेव्हापासून ती तिथेच राहत आहे.

गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अनिल हा अडेगाव येथे सासरी आला. त्याने सास-याच्या पत्नी कुठे आहे असा जाब विचारत सास-याशी वाद घातला. जावयाने अचानक हातातील कु-हाडीने सास-यावर हल्ला चढवला. बचावासाठी सास-याने हात पुढे केला. दरम्यान त्यांच्या मनगटावर गंभीर जखम झाली. त्यानंतर जावयाने सास-यास खाली पाडून छातीवर बुक्याने मारहाण केली. दरम्यान सास-याने आरडाओरड केल्याने त्यांच्या नातेवाईकांनी धाव घेऊन सास-याला जावयापासून वाचवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हल्ला केल्यानंतर जावई अनिलने कु-हाड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. तसेच उद्या पर्यंत त्याची पत्नी घरी आली नाही तर मारून टाकेल अशी सास-याला धमकी दिली. जखमी सास-याला तत्काळ ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी जावयाविरोधात बीएनएस कलम 333, 118 (2), 351 (2) नुसार गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा तपास पाटण पोलीस करीत आहे. 

भुरट्या पत्रकारावर गुन्हा दाखल: सुहास हिंगाणे आत्महत्या प्रकरण

Comments are closed.