एलआयसीला जडला लिंक फेलचा ‘संसर्ग’

ढिसाळ कारभाराचा विमाधारकांना फटका

0

जब्बार चीनी, वणी: ‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ अशी टॅगलाईन घेऊन नेहमी सोबत असल्याचा दावा करणा-या एलआयसीच्या वणीतील कार्यालयात मात्र लिंकने ऐन कोरोनाच्या संकटात साथ सोडली आहे. दर महिन्याला शेकडो विमाधारकांची मुदतपूर्तीची रक्कम वेळवर जमा होणे अपेक्षित असते, मात्र गेल्या काही दिवसांपासून एलआयसी कार्यालयात लिंक फेल असल्याने मुदतपूर्तीची तारीख संपूनही अकाउंटमध्ये रक्कम जमा न झाल्याने ग्राहकांची चांगलीच निराशा होत आहे.

करोना व लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक आधीच त्रस्त असताना त्यात आता एलआयसीने आणखी भर टाकून तंगीत तेरावा महिना आणला आहे. अडीअडचणीच्या काळात एलआयसीच्या पॉलिसीच्या माध्यमातून केलेली बचत कामी यावी यासाठी बचत केली. कोरोनाच्या काळात हातात काही पैसे राहावे यासाठी विमाधारक व्यावसायिक व शेतक-यांनी विमा कंपनीच्या कार्यालयात अर्ज सादर केले. पण तब्बल पंधरा दिवसांपासून लिंकच्या समस्येमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

जिल्हाधिका-यांचा आदेश धाब्यावर
कोरोनाच्या काळात खासगी कार्यालयाला बंदी होती. मात्र सरकारी कार्यालय उघडे ठेवा असे जिल्हाधिका-यांचे आदेश होते. मात्र हा नियम धाब्यावर बसवून कार्यालय 17 मे पर्यंत बंद राहील असा बोर्ड एलआयसी कार्यालयात लावण्यात आला होता. त्यामुळे बंद असलेल्या विमा पॉलिसीचे पुनर्जीवन असो वा इन्कमटॅक्सच्या कार्या करीता आवश्यक असलेल्या स्टेटमेंट करीता अनेक ग्राहकांनी विमा कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. अखेर हा बोर्ड काढण्यात आला. मात्र कार्यालय सुरू झाल्यानंतर लिंकची समस्या उद्भवली. परिणामी ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

विमाधारकांनी इथल्या भोंगळ कारभाराबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर अधिकारी जागे झाले मात्र त्यांना इथल्या व्यवस्थेची ‘कमान’ नीट सांभाळता आली नाही. लिंकची समस्या ही कायमचीच डोकेदुखी बनली असली तरी व्यवस्थापनातर्फे इतर पर्यायी व्यवस्था केली गेली नाही. ग्राहका याबाबत एजंटकडे तक्रार करतात त्यामुळे ग्राहकांसोबतच एजंटलाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एलआयसी ही विमा क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. अऩेक खासगी विमा कंपनीच्या भाऊगर्दीतही एलआयसीवर आजही लोकांचा विश्वास कायम आहे. मात्र ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका ग्राहकांसोबतच कंपनीलाही बसत आहे. त्यामुळे या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी विमाधारक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.