पुरुषोत्तम नवघरे, वणी : लायन्स क्लब व वणी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शवपेटीसह 10 प्रकारच्या रुग्णोपयोगी साहित्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. हे साहित्य नाममात्र शुल्कात नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या साहित्यामध्ये फोल्डर बेड, कमोड चेअर, व्हीलचेअर, कुबड्या, फोल्डर वॉकर, आय.व्ही. स्टँड, वॉकिंग स्टिक, ऑक्सिजन मशीन, एअर बेड आणि सेमी फोल्डर बेड यांचा समावेश आहे. ‘सर्जिकल बँक’च्या माध्यमातून हे साहित्य नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
लोकार्पण सोहळा लायन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या देशमुखवाडी येथील शाळेच्या सभागृहात पार पडला. यावेळी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार नगरवाला, उपाध्यक्ष महेंद्र श्रीवास्तव, विजय राठोड, सचिव प्रा. डॉ. अभिजीत अणे, कोषाध्यक्ष नंदलाल शुगवाणी आणि चार्टर्ड मेंबर प्रमोद देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
वणीकरांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा हा उपक्रम असून, लायन्स क्लब व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टची समाजाप्रती असलेली बांधिलकी यातून अधोरेखित होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ट्रस्ट व क्लबच्या अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करत नागरिकांनी उपलब्ध सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विजय राठोड यांनी केले, तर संचालन किरण बुजोणे यांनी केले. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष शमीम अहमद, डॉ. के. आर. लाल, शांतीलाल पांडे, किशन चौधरी, भिकमचंद गोयनका, संजीव चिंतलवार, ओंकार देशपांडे, यश श्रीवास्तव, ज्योती नगरवाला, ललीता बोदकुरवार, सुनिता खुंगर, खुशी नगरवाला, मधुलीका खुंगर यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य, अकॅडमिक डायरेक्टर प्रशांत गोडे, प्राचार्या चित्रा देशपांडे तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


Comments are closed.