रात्रीस चालला मोठा खेळ… मुकुटबनमध्ये रंगले दारू नाट्य

दारूचा पव्वा... किंमत अव्वाच्या सव्वा...

0

सुशील ओझा, झरी: रात्रीची वेळ… अचानक एक व्यक्ती दारूच्या दुकानात शिरतो… कुणीतरी दारूच्या दुकानात शिरल्याची माहिती मिळताच तिथे वार्डातील काही तरुण गोळा होतात…. गोळा झालेल्या तरुणासाठी दारू बाहेर काढली जाते… त्याच वेळी तिथे महिला गोळा होतात… त्यातील एक महिला मालकाला याबाबत तक्रार करणार असल्याची धमकी देते… त्याचवेळी अचानक पोलिसांची गाडी पोहोचते…. पळापळ सुरू होते…. अन् रात्रीस चालणारा हा खेळ उघड होतो… या प्रकरणी दारूची एक पेटी जप्त करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही घटना आहे मुकुटबनची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील एका देशी दारूच्या दुकानातील नोकर 14 एप्रिलच्या रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान दारू दुकानाच्या समोरील गेटचे लॉक उघडून दारूच्या पेट्या काढण्याकरिता आत शिरला. त्याच वेळी वॉर्डातील काही तरुण तेथे जमा झाले. त्यांनी स्वतःला पिण्याकरिता व विक्रीकरिता देशी दारूचे बम्पर मागितले.

दारू दुकानातून तरुणांना दारूच्या शिष्या व पेट्या काढून देत असताना त्याच वॉर्डातील एका महिलेने भट्टीतील नोकराला त्याबाबत धमकावले. भट्टीतून दारूच्या दुकानातून पेट्या काढून विक्री केली जात आहे याची माहिती तुझ्या मालकाला देते अशी धमकी त्या महिलेने दिली. दरम्यान या गोंधळात वॉर्डातील लोकांची गर्दी उसळली. दारू दुकानातून काही पेटी दारू काढत असताना महिला पोलीस तथा बिट जमादार रंजना सोयाम या आपल्या दुचाकीने मुख्यमार्गाने जात होत्या. त्यांना दुकानासमोर काही तरी सुरू असल्याची शंका आली. त्यांनी लगेच त्या दिशेन गाडी वळवली.  पोलीस येत असताना दिसताच दारूची पेटी सोडून काही तरुण पळून गेले. ती दारूची पेटी सदर महिला पोलीस यांनी जप्त केली.

प्रातिनिधिक फोटो

ही घटना 14 एप्रिलची असून याच रात्री साडे 10 वाजता दरम्यान बोलेरो गाडीने देशी व इंग्लिश दारूच्या 8 पेट्या पाटण सर्कल मधील काही गावात पोहचविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. तर 13 एप्रिलला सकाळी 10 वाजता याच देशी दारू दुकानातून स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये फुल्ल भरून सकाळी 10 वाजता दरम्यान दारूच्या पेट्या भरून सुद्धा नेल्याचीही खमंग चर्चा मुकूटबन मध्ये सुरू आहे.

महिला पोलीस रंजना सोयाम यांना दारूची पेटी मिळल्यानंतर त्यांनी चौकशी केली. सदर पेटी भट्टीत मॅनेजर म्हणून काम करणारा भूमन्ना कल्लेमवार रा लिंगटी हल्ली मुक्काम मुकूटबन याची असल्याचे समोर आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपीवर 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 750 मिलींच्या बंपरची एक पेटी किंमत 2592 रुपयांचा दारुसाठा जप्त करण्यात आला. ही पेटी कुठून आली हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दारूची खुलेआम विक्री ?

देशी दारू दुकानातून सकाळी व रात्री कुणालाही न भिता खुलेआम दारूच्या पेट्या काढून देण्याकरीत कुणाचा पाठिंबा आहे याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यात एवढे दारूचे दुकाने असून लॉकडाऊन मध्ये जनतेसमोर खुलेआम दारूच्या पेट्या काढून देण्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रशासन आवळणार का अवैध विक्रेत्यांवर फास?
लॉकडाऊन मध्ये वणी येथील बियरबार मधून अवैध दारू विक्री करणाऱ्या अक्षरा नामक बारचा परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे. तर वरोरा मार्गावरील आणखी एका बारवर अशीच कार्यवाही होणार असल्याचे चिन्ह आहे. मुकूटबन मध्येही परवाना धारक दुकानातून दारू तस्करी व गावात विक्री करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द होणार काय असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे. सदर प्रकरणाचा तपास ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली रंजना सोयाम व स्वप्नील बेलखेडे करीत आहे.

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनमुळे तालुक्यातील मद्यपींचे मोठे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाच्या आदेशानुसार बियरबार देशी दारू दुकान व वाईनशॉप बंदच्या आदेशानंतर अवैध विक्रीला ऊत आला आहे. तळीरामांना 52 रुपयांचा देशी दारूचा पव्वा 150 ते 180 रुपये तर इंग्लिश दारुची 200 रुपयांची कॉर्टर 350 ते 450 रुपये प्रमाणे विकत घेऊन प्यावे लागत आहे. लॉकडाऊन पूर्वी काढलेल्या दारूचा साठा संपल्यानंतर मद्यपींना दारू मिळणे कठिण झाले होते. या गोष्टीचा फायदा घेत अशा अवैध गोष्टी वाढत असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.