आचारसंहितेत ‘हिशेबा’त राहा, दारू विक्रेत्यांना ठाणेदारांचा इशारा
मुकुटबन व परिसरातील 10 परवानाधारक दारू विक्रेत्यांना नोटीस
सुशील ओझा, झरी: लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने सध्या देशभर आचारसंहिता लागलेली आहे. निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात दारूचा महापूर वाहतो. यावेळी अवैध दारूविक्रीलाही मोठ्या प्रमाणात ऊत येते. अवैध दारूचा साठा, नियमांपेक्षा अधिक वेळा बार किंवा वाईन शॉप सुरू ठेवणे, बंदच्या दिवशी दारू विकणे इत्यादी या काळात मोठ्या प्रमाणात चालतात. या प्रकाराची जबाबदारी देशी दारू दुकानदार व बार चालकाची असल्याने पोलिसांनी अशा विक्रेत्यांना मुकुटबन पोलिसांनी नोटीस दिली आहे.
मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी मुकुटबन येथील २ व मांगली येथील १ परवाना धारक देशी दारू दुकानदार तसेच ७ परवानाधारक बियरबार चालकांना नोटीस दिली आहे. यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू विक्रीचे शर्ती व अटींचे पालन करून दारूची विक्री करावी अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच दारू विक्री करताना नियमाचे उल्लंघन केल्यास निवडणूक विभागाकडे याचाअहवाल पाठवुन सदर दुकानाला सील लावण्याचे कार्यवाही केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
देशी दारू दुकान व बियरबार चालकांनी वेळेच्या आत दुकाने उघडू नये. तसेच दिलेल्या वेळेच्या नंतर दुकान उघडे ठेवू नये. शासकीय बंदच्या दिवशी दिवसभर दुकाने उघडे नये. एका व्यक्तीस पिण्याकरिता दारूचा किती पुरवठा करावा याबाबत दिलेल्या नियमाचे पालन तंतोतंत करावे. दुकानातून इतरांना विक्रीकरिता किंवा अवैधरित्या व्यवसायकरिता दारू विक्री करू नये. अशा प्रकारची नोटीस सर्व बार चालक व देशीदारू दुकानदारांना देण्यात आली.
दुसरीकडे बारचालक व देशी दारू दुकानदार वरील सर्व नियमाला बगल देत एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करत आहेत. देशी दारूच्या बॉटलची किंमत ५२ रुपये असताना ५५ ते ६० रुपये दराने विक्री सुरू आहे. तर विदेशी दारूवर २० रुपयांपासून तर १०० रुपयांपर्यंत अधिक घेऊन विक्री सुरू आहे. त्यामुळे यात ग्राहकांची मोठी लूट होताना दिसत आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे हात ‘ओले’?
परिसरात अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, देशी दुकानात दारू प्यायला देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, १९ वर्षाखालील तरुणांना दारू देने, पहाटेच दुकाने उघडणे, चिल्लर दारू विक्रीचा परवाना देशी दारू दुकानदारांना असताना १० पवे पासून तर ५० ते १०० पेटी दारूची ठोक विक्री अवैध दारू विक्री करणाऱ्यांना देणे, तसेच इतरही नियमांना ढाब्यावर बसवून दारू व बियरची विक्री मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाला कल्पना असून कोणत्याही दुकानदारांवर कार्यवाही करण्याऐवजी ते यात हात ‘ओले’ करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य करीत आहे.