दुपारी आमदारांची तक्रार, संध्याकाळी बंदीचा आदेश

उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी

0

जब्बार चीनी, वणी: आजची सकाळ वणीतील मद्यप्रेमींसाठी आनंद आणि उत्साहच घेऊऩ आली. मात्र त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. आज संध्याकाळी दारूविक्री दरम्यान खबरदारी तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येत पर्यंत दारू विक्रीला बंदी आणली आहे. याबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तक्रार केली होती हे विशेष. या तक्रारीमुळेच संपूर्ण जिल्ह्यात मद्यविक्रीची परवानगी रद्द करण्यात आल्याचा कयास राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

आजपासून मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली होती. रात्री उशीरा आदेश आल्याने संपूर्ण जिल्ह्यात केवळ वणी येथील एकमेव वाईन शॉप सुरू होते. वाईन शॉप सुरु झाल्याची बातमी वा-यासारखी शहरात पसरली. परिणामी लोकांनी तिथे एकच गर्दी केली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम इथे धाब्यावर बसवले गेले. इथे ग्राहकांनी केलेला गोंधळ बघून पोलिसांनीही काहींना प्रसाद दिल्याची माहिती आहे. यासह 12 नंतरही प्रशासनाच्या आदेशाला हरताळ फासून बराच काळ छुप्या रितीने मद्यविक्री या शॉपमधून सुरु होती.

खा. बाळू धानोरकरांची दुकानासमोर बैठक
मद्यविक्री होताना कोणताही अनुचित प्रकार किंवा गोंधळ होऊ नये म्हणून वाईन शॉपचे मालक व चंद्रपूर आर्णी मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर यांनी तिथे काही काळ ठिय्या दिला होता. दरम्यानच्या काळात वणीचे आमदार संजीवरेड़्डी बोदकुरवार यांनी या शॉपसमोर चक्कर मारून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. अखेर आमदार बोदकुरवार यांनी मद्यविक्री करताना सोशल डिस्टन्सिंगला  हळताळ फासली जाते परिणामी कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, त्यामुळे जिल्ह्यातील मद्यविक्री बंद करावी अशी निवेदन देऊन मागणी केली.

दुपारी 12 नंतरही छुप्या रितीने सुरू होती वाईन शॉपमधून मद्य विक्री

निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूच्या संक्रमनाचा विचार न करता केवळ महसूल उत्पन्नासाठी मद्य विक्रीला दिलेली परवानगी ही अतिशय घातक आहे. दारुच्या दुकानासमोर उडालेल्या लोकांच्या झुंबडमुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. वणी येथील पार्थ वाइन शॉप मध्ये सुरू झालेल्या मद्यविक्री नंतर उडालेली झुंबड सर्वांची झोप उडवणारी आहे. अशी स्थिती थोड्या फार फरकाने महाराष्ट्रात सर्वत्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील मद्यविक्रीवर बंदी आणावी अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली होती.

वणीकरांचा हिरमोड
केवळ एका दिवसात दारूबंदी झाल्याने वणीकरांचा हिरमोड झाला आहे. त्यासोबत वणीत वाईन शॉप सुरू झाल्याने इतर गावातील मद्यप्रेमींच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. उद्या दिवस उजाडल्यावर काय करायचे याचे प्लानिंगही मद्यप्रेमींनी केले होते. मात्र दिवस उजाडायच्या आधीच संध्याकाळी बंदीचा आदेश आल्याने वणीसह संपूर्ण जिल्ह्यातील मद्यप्रेमींचा हिरमोड झाला आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केलेल्या मागणीमुळेच जिल्ह्यात मद्यविक्रीची परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा असून आमदारांनी खासदारांना धोबीपछाड दिल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.

(हे पण वाचा- 12 वाजतानंतरही वणीत सुरू होती मद्यविक्री)

Leave A Reply

Your email address will not be published.