दारु तस्कराने उडवले 4 वर्षांच्या चिमुकलीला, चुटकीचा मृत्यू…

घराबाहेर खेळत असलेल्या चुटकीला दारू घेऊन जाणा-या दुचाकीची जबर धडक

निकेश जिलठे, वणी: अवैधरीत्या दारूचे बॉक्स घेऊन जाणा-या एका दारू तस्कराने भरधाव दुचाकी चालवत घरासमोरील रस्त्यावर खेळणा-या एका चार वर्षीय चिमुकलीला उडवले. या अपघातात तिचा मृत्यू झाला. अंकिता उर्फ चुटकी प्रवीण वाघाडे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास झरी तालुक्यातील चिचघाट येथे ही घटना घडली. या प्रकरणी दारू तस्कराकडून देशी दारूच्या 2 पेट्या जप्त करण्यात आल्या आहे. या घटनेमुळे गावक-यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. चुटकीच्या कुटुंबीयांनी चुटकीचा मृतदेह घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आरोपी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे झरी तालुक्यातील दारु तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. 

तक्रारीनुसार, फिर्यादी प्रवीण गजानन वाघाडे (39) हे चिचघाट ता. झरी येथील रहिवासी आहेत. त्यांना एक मुलगा व धाकटी मुलगी आहे. मुलीचे नाव अंकिता उर्फ चुटकी (4) असे आहे. बुधवारी दिनांक 5 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास चुटकी घरासमोरील रोडवर खेळत होती. दरम्यान घोन्सा कडून एक काळ्या रंगाची पॅशन प्लस ही दुचाकी (MH29CE5546) आली. या भरधाव दुचाकीने रोडवर खेळत असलेल्या चुटकीला जोरदार धडक दिली. यात धडकेत चुटकीच्या पोटाला जबर आघात झाला. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अपघात होताच सोबत खेळणा-या मुलामुलींनी आरडाओरड केला. आवाज ऐकून चुटकीचे वडील आले. त्यांनी चुटकीला उचलले तसेच दुचाकी चालकाचे नाव पत्ता विचारला. चालकाने त्याचे नाव अविनाश भीमराव मरसकोल्हे (29) रा. बग्गी अकोली ता. केळापूर असे सांगितले. चुटकीच्या वडिलांनी तिला वणीतील एका खासगी दवाखान्यात उपचार करण्यास दाखल केले. डॉक्टरांनी चुटकीवर उपचार करून रात्री उशिरा तिला सुट्टी दिली.

रात्री 12 वाजताच्या सुमारास चुटकी तिच्या आईजवळ झोपी गेली. मात्र पहाटे 3 वाजताच्या सुमारास तिच्या आईला चुटकी कोणतीही हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. तिने तातडीने याची माहिती तिचे पती प्रवीणला दिली. तिचा झोपेतच मृत्यू झाला होता. चुटकीच्या वडिलांनी याची माहिती मुकुटबन पोलीस स्टेशनला दिली.  

दुचाकी चालक दारू तस्कर !
अपघात झाला तेव्हा आरोपी अविनाश हा देशी दारूचे 2 बॉक्स घेऊन दुचाकीने बोपापूर येथे जात होता, मात्र एफआयआरमध्ये त्याचा कोणताही उल्लेख नसल्याचा आरोप चुटकीच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे झरी तालुक्यातील दारू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे. झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असून अनेक छोटे मोठे तस्कर दारू घेऊन दुचाकीने भरधाव जातात. यातच हा अपघात झाला, असा आरोप चुटकीच्या वडिलांनी व काकांनी केला आहे. सदर दारू कुठून आणली गेली. ही दारू कुठे पोहचवली जात होती. असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.

चुटकीच्या वडिलांनी माहिती दिल्यानंतर मुकुटबन पोलीस चिचघाट येथे आले. चुटकीला झरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी तिला अधिकृतरित्या मृत घोषीत केले. यावेळी चिचघाट येथील नागरिक मोठ्या संख्येने गोळा झाले होते. त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे काही काळ ग्रामीण रुग्णालय आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी  अविनाश भीमराव मरसकोल्हे (29) रा. बग्गी अकोली ता. केळापूर याच्याविरोधा बीएनएसच्या कलम 281. 106 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. सदर घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. 

Comments are closed.