सुशील ओझा, झरी: महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. या जिल्ह्यात दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत असताना शासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच याठिकाणी दारूचा महापूर वाहत आहे. झरी तालुक्यातील मुकुटबनमधून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरू आहे. तालुक्यातील अडेगाव, घोन्सा येथेही अवैध दारू विक्रीने कळस गाठला आहे. मात्र पोलीस आणि अबकारी विभागाने अर्थपूर्ण संबंधातून याकडे डोळेझाक चालवित असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस व अबकारी विभाग कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन बसल्याने तस्करांचे फावत आहे. झरी तालुक्यातील अडेगाव व घोन्सा येथे खुलेआम अवैध दारू विक्री व मटकापट्टी सुरू आहे. मुकुटबन येथे पहाटे ५ ते ७ वाजेपयंर्त दारू विक्री सुरू असून, मटकापट्टी मोबाइलवर व पट्टी फाडून मटका घेणे सुरू आहे. याबाबत पोलीस विभाग अनभिज्ञ असल्याचे दाखवित आहे. तसेच गावातील मध्यवस्तीत असलेला व गावाबाहेरील एक असे दोन बीयर बारमधून इंग्लिश दारू दररोज चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर, कोरपना तसेच अडेगाव, पुरड, कायर येथे जात आहे.
यासाठी चारचाकी व दुचाकी वाहनांचा वापर केला जात आहे. दारू पुरवठा मांगली मार्गाने झरी ते घोन्सा तर खडकी, गणेशपूर, वेळाबाई मार्ग कोरपना व गडचांदूर तसेच येडसीवरून खातेरा ते पार्डी मार्ग चंद्रपूर जिल्ह्यात केला जात आहे. मुंबई, चंद्रपूर व इतर पासिंग असलेल्या चारचाकीने गणेशपूर येथील एका घरात दारूचा साठासुद्धा करून ठेवला जात आहे व रात्रंदिवस वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे.
मुकुटबन येथून दारूची भरलेली गाडी काढण्यापूर्वी दारू तस्कराचा एक माणूस गणेशपूरपयंर्त दुचाकीने पुढे जाऊन लोकेशन घेत असून, त्यानंतरच वाहनाची चाके समोर चालत असल्याचे सांगितले जाते. तसेच देशी दारू मुकुटबन व मांगली येथील दारू दुकानातून दिवसरात्र घोन्सा अर्धवन ते अडकोली मार्ग तर मुकुटबन येथून गणेशपूर, कोसारा ते रासा मार्ग इंग्लिश व देशी दारू घोन्सासह परिसरात पाठविली जात आहे.
घोन्सा येथे नदीपात्रात व बसस्टॅण्डवर लहान मुलांच्या हस्ते दारूची विक्री जोमात सुरू आहे. मात्र, पोलीस आणि अबकारी विभागाची विविध पथके याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत आहे. अडेगाव येथे १० ते २० पव्वे विकणारे ५ ते ६ लोक असून एका विक्रेत्याला पोलिसांनी अधिकृत परवानगी दिल्याची चर्चा आहे तर अन्य विके्रत्यांची पोलिसांना माहिती असूनही त्यांच्याकडून ‘लक्ष्मीदर्शन’ होत असल्याने कारवाई टाळली जात आहे. काही पोलीस कर्मचारी तर फक्त देशी दारूच्या भट्टी राखत असल्याची चर्चा आहे. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी मोजक्या केसेस केल्या जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे..