भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा व मोटरसायकल रॅली

जितेन्द्र कोठारी, वणी : भगवान विष्णूच्या दहा अवतारामधील सहावे अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांची जयंती शनिवार 22 एप्रिल रोजी वणी येथील बहुभाषिक ब्राह्मण समाजातर्फे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त मोटरसायकल रॅली व भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. विविध झांकी आणि परशुरामाच्या प्रतीमासह निघालेल्या या शोभायात्रेत ब्राह्मण समाजातील शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते. 

येथील जैताई माता देवस्थान येथून शोभायात्रेची सुरुवात झाली. शहरातील टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, जत्रा मैदान, रंगनाथ स्वामी मंदिर, टागोर चौक, आंबेडकर चौक मार्गातून मार्गक्रमण करून परत जैताई मंदिर येथे रेलीची सांगता करण्यात आली. दरम्यान रंगनाथ स्वामी मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले. परशुराम जयंती उत्सवात ब्राह्मण समाज सभाचे अध्यक्ष माधव सरपटवार, राजाभाऊ पाथ्रडकर, मुन्ना महाराज तुगनायत, राजू उंबरकर, मुलचंद जोशी व गणमान्य समाज बांधव उपस्थित होते.

जाणून घ्या, कोण होते भगवान परशुराम ?

हिंदू पंचागानुसार, दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला भगवान परशुरामांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान परशुराम हे महर्षी जमदग्नी आणि रेणुका यांचे अपत्य आहेत. हिंदू मान्यतेनुसार, प्रदोष काळात भगवान परशुराम प्रकट झाले आणि ते 8 चिरंजीवी पुरुषांपैकी एक आहेत. असे मानले जाते की भगवान परशुराम आजही या पृथ्वीवर विराजमान आहेत. परशुराम जयंती आणि अक्षय तृतीयेला केलेले दान कधीही क्षय होत नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी जन्म घेतल्याने भगवान परशुरामाची शक्तीही अक्षय होती.

Comments are closed.