भर दिवसा ठगांनी महिलेला लुटले… लाखोंचे दागिने लंपास

पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात चोरट्यांनी धुमाकूळ सुरु असतानाच आता चोरट्यांनी चक्क पोलीस असल्याची बतावणी करून एका महिलेला लुटले. भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर आज दुपारी ही घटना घडली. या घटनेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या असे एकूण 9 तोळ्याचे दागिने भामट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला ही रविनगर भागात राहते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास सदर महिला ही घरून साई मंदिराकडे जात होती. दरम्यान नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार मॉल जवळ एक दुचाकीस्वाराने महिलेला थांबवले. दुचाकीवरील दोघांनी ते पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच काही वेळापूर्वी चाकूच्या धाकावर एका महिलेचे दागिने लुटल्याचे सांगितले. तसेच त्या महिलेला त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने रुमालात बांधून ठेवायची सूचना केली.

या भामट्यांवर विश्वास ठेवून महिलेने मंगळसूत्र, बांगड्या इत्यादी अंगावरील संपूर्ण दागिने काढून रूमालामध्ये बांधले. दरम्यान महिलेला बोलण्यात गुंतवून दोन्ही चोरट्यांनी हातचलाखी करत ते दागिने लुटले व तिथून पळ काढला. दागिने हिसकल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत दोन्ही चोरट्यांनी तिथून धूम ठोकली होती.

पिडीत महिलेने घटनेबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असून पोलीस घटनास्थळ परिसरात सीसीटिव्ही फुटेज तपासत आहे. बातमी लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

(अधिक माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल)

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!