जितेंद्र कोठारी, वणी : एस.टी. बसमध्ये चढताना किंवा प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या पर्स मधून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यास वणी पोलिसांना यश मिळाले आहे. अटक करण्यात आलेली सर्व 5 महिला आरोपी नागपूर येथील रहिवासी आहे. आरोपी महिलांकडून वणी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेले 2 गुन्हे कबूल केले असून आणखी गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी तापस नारायण गाईन रा. मुकुटबन हे आपल्या पत्नीसह दि. 17 डिसेंबर 2022 रोजी चंद्रपूर जाण्याकरिता वणी बस स्थानकावर आले होते. चंद्रपूर जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलेने त्यांच्या पत्नीच्या पर्समधून 72 हजार 500 रुपयाचे सोन्याचे दागिने लंपास केले. तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी किरण पचारे रा. वणी ही तिचे पतीसह दि. 3 जानेवारी 2023 रोजी भद्रावती जाण्याकरिता बसमध्ये चढताना तिच्या पर्स मधील काळ्या मण्याची सोन्याची पोत आणि 3 हजार 500 रुपये नगद असे 23 हजार 500 रुपयांचा माल अज्ञात आरोपीने चोरून नेले.
दोन्ही घटनेचा तपास करीत असताना वणी पोलिसांना शहरात काही अनोळखी महिलांची टोळी फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीवरून वणी पोलिसांनी प्रीती रोशन उफाडे (26), प्रीती रामसिंग शेंडे (30) व शालू सूचित लोंढे (30), लक्ष्मी रमेश हातागडे (35) व नम्रता चैतराम उफाडे (25) सर्व रा. रामेश्वरी, रामटेक नगर, आंबेडकर पुतळ्या जवळ नागपूर यांना ताब्यात घेतले. विचारपूस दरम्यान आरोपी महिलांनी वरील दोन्ही गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यांना अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांचे मार्गदर्शनात सपोनी माधव शिंदे, स.फौ. सुदर्शन वानोळे, डोमाजी भादिकर, पोलीस हवालदार सुहास मंदावार, विठ्ठल बुरुजवाडे, हरिंदर भारती, सागर सिडाम, पुरुषोत्तम डडमल यांनी केली.