सावधान: लिफ्ट देण्याची बतावणी करून दोन भामट्यांनी एकाला लुटले

18 नंबर पूल जवळ मारहाण करून पैसे व मोबाईलची लूट

बहुगुणी डेस्क, वणी: गावी परतणा-या एका व्यक्तीला लिफ्ट देण्याची बतावणी करून दुचाकीवर बसवले. 18 नंबर पुलाजवळील वनात नेऊन त्या व्यक्तीला मारहाण करीत त्याच्याजवळील पैसे व मोबाईल लुटला. शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी रोजी दु. 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दोन भामट्यांविरोधात वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी मो. जुबेर अब्दुल सलाम (33) रा. खरबडा वणी व अशपाक उर्फ अईया साहेब खान पठाण (28) रा. खरबडा या दोन आरोपींना शनिवारी संध्याकाळी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. 

तक्रारीनुसार, पीडित किशोर रामचंद्र ठावरी (51) हे नवरगाव (कायर) येथील रहिवासी आहे. ते वणीला नांदेपेरा रोडवरील एका थेरपी सेंटरमध्ये थेरपीसाठी येतात. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता ते बसने वणी येथे नवरगावहून आले होते. थेरपी झाल्यानंतर 10.30 वाजताच्या सुमारास ते गावी परत जाण्यासाठी निघाले.

ते बस स्टँडवर पायी जात असताना बाकडे पेट्रोल पम्प जवळ एक मोटारसायकल त्यांच्या जवळ आली. मोटार सायकलच्या मागे बसलेल्या तरुणाने किशोर यांना कुठे जात असल्याचे विचारले. त्यांनी नवरगाव येथे जात असल्याचे सांगताच ते दोघेही म्हणाले की ते देखील नवरगावलाच जात आहे. तुम्हाला गावी सोडून देतो असे म्हणत त्यांनी किशोर यांना लिफ्ट दिली.

18 नंबर पुलाजवळ चालकाने त्याची दुचाकी मेंढोली रोडकडे वळवली. चुकीच्या रस्त्यावर दुचाकी नेल्याने किशोर यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवण्याची विनंती केली. मात्र त्यांनी दुचाकी मेंढोली रोडवर नेली. तिथे वनात त्यांनी गाडी थांबवली. दोघेही दुचाकीवरून खाली उतरले. त्यातील एकाने किशोर यांना मानेवर पकडून खाली पाडले. त्यांनी मारहाण करीत किशोर यांच्या खिशातील चार हजार रुपये बळजबरीने काढले. सोबतच शर्टच्या खिशातील आठशे रुपये व मोबाइल हिसकावत दोन्ही भामट्यांनी तिथून पळ काढला.

किशोर त्यानंतर पायीच गावी गेले. त्यांनी परिचिताला सोबत घेत वणी पोलीस स्टेशन गाठले व या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम 309(4) व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी दोन्हीही आरोपीला अटक केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.