मैत्रिणीने करून दिली भावाशी ओळख, पळून जाऊन लग्न

अधुरी एक कहाणी... अल्लड वयातील आंधळ्या प्रेमाचा करुण अंत...

बहुगुणी डेस्क, वणी: किशोर वय… शाळा संपल्यानंतर तिने नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या अल्लड वयातील मुलं मुली जसे प्रेमाच्या आकर्षणाला बळी पडतात, तशी ती देखील पडली. तिच्या मैत्रिणीने तिच्या भावाशी ओळख करून दिली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात पडलेली मुलं-मुली डोक्याने विचार करण्यापेक्षा हळवे होऊन मनाने किंवा हदयाने निर्णय घेतात. असाच निर्णय तिने देखील घेतला. घरच्यांच्या मनाविरुद्ध जात तिनं पळून जाऊन लग्न केलं. त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक फुल देखील उमलणार होतं. मात्र म्हणतात ना की जिथे प्रेम, पझेसिव्हनेस आहे. तिथेच संशय देखील वास करतो. अवघ्या सहा महिन्यात प्रेमाचा ज्वर उतरला व त्याची जागा संशयाने घेतली. हा संशय इतका वाढत गेला की या प्रेमाचा शेवट आत्महत्येने झाला. ही कहाणी आहे पायलची… प्रेमात जरी ती यशस्वी झाली असली, तरी त्यानंतर सुरु झालेली तिची सहजीवनाची वाटचाल अवघ्या 10 महिन्यातच संपली. 

सीता गजानन चार्लीकर (40) या नवरगाव ता. वणी येथील रहिवासी आहे. पती, एक मुलगा व मुलगी असे त्यांचे चौकोनी कुटुंब. पती पत्नी शेती करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचे. पायल ही 2020 मध्ये 10 वी झाली. तिने 11 वीसाठी वणीतील एका महाविद्यालयात ऍडमिशन घेतली. त्यामुळे ती वणीला बस किंवा इतर वाहनाने शिक्षणासाठी यायची. परसोडा येथील निकीता मारोती उरकुडे ही देखील त्याच महाविद्यालयात शिक्षण घ्यायची. एकाच वर्गात व वणीला एकाच वाहनातून जात असल्याने पायल व निकिताची ओळख झाली. पुढे या दोघींची चांगली मैत्री झाली.

निकिताशी मैत्री झाल्याने पायल अध्येमध्ये तिच्या घरी परसोडा येथे जायची. त्यातच पायलची निकीताचा भाऊ गौरव मारोती उरकुडे याच्याशी ओळख झाली. गौरव हा तेव्हा मजुरी करायचा. पायल आणि गौरव यांच्यातील ओळख आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. ते दोघे एकमेकांशी तासंतास फोनवर बोलत. संधी मिळाल्यास ते दोघे भेटत देखील होते. त्याच वेळी दोघांनी सोबत जगण्याची शपत घेत एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र पायल अल्पवयीन होती. त्यामुळे जोपर्यंत 18 वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत लग्न करायचे नाही, असे त्यांनी ठरवले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पळून जाण्याचा निर्णय
दोघांच्या ओळखीच्या 2 ते 3 वर्षांनी पायलने 18 वर्ष पूर्ण केले. त्यामुळे त्या दोघांनी लग्नाचा विचार केला. घरून लग्नाला विरोध होणार म्हणून पायलने पळून जाण्याचे ठरवले. दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पायलने तिच्या वडिलांना पेपरला जात असल्याचे कारण सांगितले. त्यानंतर ती घरून निघून गेली. मात्र ती संध्याकाळी घरी परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी दोन दिवस तिचा शोध घेतला. त्यांना पायल घरून पळून गेल्याचा संशय होताच, दरम्यान त्यांना पायल आणि गौरवने मंदिरात लग्न केल्याचे कळले. त्यानंतर पायलचा घरच्यांशी संबंध तुटला.

लग्नानंतर गौरवने परिसरातील एका खासगी कंपनीत काम करणे सुरु केले. पायल देखील गर्भवती राहिली. दुसरीकडे दोन तीन महिण्यातच पायलला तिच्या आई वडिलांनी माफ केले. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध निर्माण झाले. एकीकडे सर्व चांगले होत असताना दुसरीकडे मात्र पायल आणि गौरव यांच्या नात्यात कटुता येण्यास सुरुवात झाली. गौरव हा पायलच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून दोघांमध्ये कुरबुरी व्हायच्या. कुरबुरी वाढत जाऊन वाद निर्माण व्हायचा. सततच्या वादामुळे 16 ऑगस्ट रोजी गौरव पायलला घेऊन माहेरी नवरगाव येथे गेला. पाहुणचार झाल्यानंतर गौरव पायलला माहेरीच सोडून परसोड्याला निघून गेला.

घरी माहेरी पायलने तिच्या आईला गौरव चारित्र्यावर संशय घेतो, मारहाण करतो अशी माहिती दिली. उरकुडे कुटुंबीयांना घरकूल योजनेतून घर मंजूर झाले होते. त्यामुळे त्यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. घराच्या बांधकामासाठी 1 लाख रुपये घरून घेऊन ये, मी तुमच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केल्याने आतापर्यंत पैसे मागितले नाही, असे पायलने तिच्या आईला सांगितले. सध्या पैसे नाही, शेतमाल विकल्यावर पैसे देते, असे आईने पायलला सांगितले. चार पाच दिवस घरी राहिल्यानंतर पायलच्या भावाने पायलला परसोडा येथे सोडले.

घरासाठी पैसे मागितल्याचा आरोप
11 सप्टेंबर रोजी पायल व गौरव हे दोघेही पायलच्या घरी नवरगाव येथे गणेशोत्सवासाठी आले. यावेळी पायलच्या आईने पायलला 50 हजार रुपये दिले. मात्र आता पैसे नसल्याने यापुढे पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे पैसे मागू नको, असे पायलच्या आईने पायलला बजावले. त्यानंतर पैसे घेऊन दोघेही परसोडा येथे परत गेले. मात्र दोघांच्या नात्यात वाद सुरुच होता. संशयाचे भूत डोक्यात असल्याने दोघांमध्ये वाद सुरुच होते. 

आत्महत्येआधी आईला कॉल…
दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 8.15 वाजताच्या सुमारास पायलने तिच्या आईला कॉल केला. तिने आईला घरचे कामं झाले का विचारले. मात्र आईला संशय आला. तिने पायलला इतक्या सकाळी कॉल का केला? काय झाले? सर्व ठिक तर आहे ना? असे विचारले. यावर तिने नवरा गौरव नेहमी चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालतो, असे म्हणत पायलने कॉल कट केला. त्यानंतर तिने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. पायल ही आत्महत्या करताना 7 महिन्यांची गर्भवती होती.

प्रेमात पडायला अमुक एक वय अवश्यक नसते. हे खरेच आहे. मात्र अल्लड वयातील प्रेमात परिपक्वता (मॅच्युरिटी) नसते. या वयातील प्रेमात ओव्हर पझेसिव्हनेस असतो. गौरव व पायल दोघांनी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. मात्र संशयाचे भूत असे काही डोक्यात शिरले की लग्नानंतर अवघ्या 10 महिन्यातच या प्रेमाचा करुण अंत झाला.    

Comments are closed.