वणी विभागात दिसून आली सुप्त परिवर्तनाची लाट

'दुधवाला की दारूवाला?' मंत्राची चालली नाही जादू

0

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील आज गुरुवारी 11 एप्रिल रोजी झालेल्या वणी विधानसभा क्षेत्रातील मतदारांमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट दिसून आली. त्यामुळे निदान या क्षेत्रात तरी ‘दुधवाला की दारूवाला?’ हा निवडणूक प्रचारादरम्यान ऐरणीवर आणण्यात आलेला प्रश्न लोकांनी तितकासा गांभीर्याने घेतल्याचे दिसून आले नाही.

Podar School 2025

शिवसेनेतून ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळण्यातही सुरेश (बाळू) धानोरकर यशस्वी झाले; तेव्हाच भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहणार, असे भाकित त्यांच्याच पक्षातील अनेकांनी वर्तविले होते. वणी विधानसभा क्षेत्र तसा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला. 2004 व 2014 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता वणी विधानसभेने काँग्रेसला झुकते माप दिले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या लाटेने वणी विधानसभा क्षेत्रात अहिरांना चांगली आघाडी मिळवून दिली होती. त्यामुळे 2019 च्या या निवडणुकीत हंसराज अहिरांची मदार वणी विधानसभेवर राहणार हे साहजिकच होते; आणि म्हणूनच त्यांनी सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा प्रचाराच्या रिंगणात उतरविले.

धानोरकरांना काँग्रेसची उमेदवारी घोषीत झाल्याबरोबर भाजपच्या प्रचार टीमने त्यांच्या व्यवसायावरून सातत्याने त्यांना टारगेट केले. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा ‘दुधवाला की दारूवाला?’ असा थेट प्रश्न जाहीर सभेत विचारून मतदारांवर भावनिक गारूड करण्याचा प्रयत्न केला होता.

आज मतदानादरम्यान ‘वणी बहुगुणी’च्या टीमने वणी शहरात तसेच वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील अनेक गावात प्रत्यक्ष जाऊन कानोसा घेतला. यात मतदारांमध्ये परिवर्तनाची सुप्त लाट दिसून आली. 1957 ते 62 या कालावधीत कुणबी समाजाचा खासदार वणी येथील होता. त्यानंतर तब्बल 62 वर्षांनी काँग्रेस पक्षानी या समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. त्यामुळे आजच्या मतदान प्रक्रियेत हा समाज ब-याच अंशी काँग्रेसकडे झुकल्याचे दिसून आले. या समाजातील काँग्रेस व्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांशी निष्ठा असणा-यांनी सुद्धा धानोरकरांना कौल दिल्याचे दिसून आले.

आपले मत वाया जाऊ नये म्हणून वंचित बहुजन आघाडी व बसपाच्या अनेक मतदारांनी काँग्रेसकडे कल दाखवल्याचे ‘वणी बहुगुणी’च्या आजच्या सर्वेक्षणात दिसून आले. या शिवाय बहुअंशी मुस्लिम मतदारांनीसुद्धा काँग्रेसचा उमेदवार कोण आहे? याला महत्त्व न देता आपल्याला मोदींविरोधात मतदान करायचे आहे, या सुप्त भावनेने काँग्रेसशी ‘हात’ मिळवणी केल्याचे दिसून आले. उमेदवार काँग्रेसचा असला तरी वणी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या नेत्यांनी धानोरकरांचा हिरिरीने प्रचार केल्यामुळे धानोरकरांचा ‘हात’ मजबूत होण्यास मदत झाली

वणी विभागात सरासरी 70 टक्के मतदान
वणी स्थित निवडणूक विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार वणी विधानसभा क्षेत्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 62.49 टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता. हा आकडा सरासरी 70 टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज निवडणूक विभागाच्या अधिकृत सूत्रांनी वर्तवला.

झरी तालुक्यातील कोसारा येथे सकाळी सात वाजेच्या आधी निवडणूक प्रतिनिधींच्या समोर घेण्यात आलेल्या मॉक पोलिंग दरम्यान ईव्हीएमध्ये तांत्रिक बिघाड आला; त्यानंतर लगेच तेथे ईव्हीएम बदलून देण्यात आले. याशिवाय एक दोन ठिकाणी काही वेळासाठी तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम बंद पडल्याचे आढळून आले. परंतु त्याही ठिकाणी निवडणूक यंत्रणेला त्वरित ही समस्या सोडवण्यात यश आले. तर मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) येथील गावक-यांनी आपल्या गावातील समस्या सोडवण्यासाठी राजकीय नेते व प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याने आजच्या मतदानावर बहिष्कार टाकला. हा अपवाद वगळता वणी विधानसभा क्षेत्रातील मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.