पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण नूतन ग्रंथालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सहसचिव अशोक सोनटक्के, संचालक उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे, नरेंद्र मुनोत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे उपस्थित होते.
या ग्रंथालयात 53 हजारांहून अधिक ग्रंथ, 18 मासिके, 9 वृत्तपत्रे, अनेक ऑनलाइन ई-बुक्स आणि जर्नल्स, तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त एनपीटीईएल लेक्चर्स उपलब्ध आहेत. 130 विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी अभ्यासाची सुविधा देणारा वाचन कक्ष, शिक्षक आणि संशोधकांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था आणि संगणकीय सुविधा यामुळे हे ग्रंथालय वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.
दुर्मिळ संदर्भग्रंथ, कोशवाङ्मय आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अत्याधुनिक ग्रंथांचा समावेश या ग्रंथालयात आहे. केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संशोधक आणि वाचनप्रेमींसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ग्रंथालयाचे कर्मचारी जयंत शेंडे, आनंद नगराळे, संतोष चांदेकर, सुरेंद्र समर्थ आणि सुशील मेश्राम यांचे सहकार्य लाभले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत खुले असणाऱ्या या ग्रंथालयाचा लाभ विद्यार्थी, शिक्षक आणि वाचकांनी घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रसाद खानझोडे आणि ग्रंथपाल डॉ. गुलशन कुथे यांनी केले आहे.



Comments are closed.