विवेक तोटेवार, वणी: बुधवारी 26 ऑगस्ट रोजी रात्री तालुक्यातील टाकळी येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला. या पशुचा मृत्यू हा लंपी त्वचारोगाने झाला असल्याचे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. कोलगाव पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने वेळीच इलाज होऊ शकला नाही. हा मृत्यू शासनाच्या गलथानपणामुळे झाल्याचा आरोप टाकळीवासीयांनी केला आहे. याबाबत शासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन तहसीदारांना देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, सध्या सगळीकडे लंपी त्वचारोगाने थैमान घातले आहे. या रोगात पशुच्या शरीरावर गाठी येऊन त्या फुटतात. परंतु या रोगाने कोणत्याही जनावराचा मृत्यू होत नाही, असे शासनाचे म्हणणे आहे. परंतु या आजाराने टाकळी येथील रहिवासी असलेल्या महादेव बापूजी झाडे यांच्या बैलाचा मृत्यू झाला. असे शेतकरी संघटनेचे नेते दशरथ पाटील यांचे म्हणणे आहे.
महादेव झाडे हे अल्पभूधारक असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्यांच्या बैल लंपी आजाराणे ग्रस्त होता. त्यांनी बैलाला वाचविण्यासाठी खाजगी डॉक्टरांकडून प्रयत्न केले. परंतु कोलगाव येथील शासकीय पशूउपचार केंद्रात पशू वैद्यकीय अधिकारी नसल्याने बैलाचा उपचार करता आला नाही. त्यामुळे बैल दगावला.
यास शासन जबाबदार असल्याने शासनाने या शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. ज्याप्रमाणे अतिवृष्टी, वीज पडणे, पाण्यात बुडन मृत्यू या नैसर्गिक आपत्तीसाठी जशी शासन नुकसानभरपाई देते. तसेच सदर शेतकऱ्याला बैलाच्या मृत्यूची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
बैलाचा मृतदेह पंचायत समिती समोर आणून शेतकऱ्यांचे निदर्शन
आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याकरिता टाकळी येथील शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभागृहासमोर बैलाचा मृतदेह ठेऊन निदर्शन केले. पशू वैद्यकीय अधिकारी नसल्याने बैलाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. त्याचप्रमाणे इतक्या दिवसात या लंपी आजारासाठी शासनाकडून कोणतीही उपाययोजना राबविण्यात आली नाही. असंही पशूपालकांचं म्हणणं आहे. या घटनेस शासनच जबाबदार मानून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.