विवेक तोटेवार, वणी: मॅकरून स्टुडंट अकाडमी नावाने वडगाव टीप येथे सीबीएसईची इंग्लिश मीडियम शाळा आहे. या ठिकाणी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरायचे. मात्र गेल्या वर्षीपासून प्राथमिक शाळेचे 1 ते 4 वर्ष हे गंगशेट्टीवार मंगल कार्यालय येथे हलवण्यात आले. इथे वर्ग भरवण्यास शाळेला परवानगी नसल्याने या शाखेत पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. मीडियातून याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. शिवाय याबाबत अनेक तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. अखेर यावर कार्यवाही करत शिक्षण विभागातर्फे शाळेच्या गेटवर सूचना फलक लावण्यात आला आहे. यामुळे या शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शाळा प्रशासनाने नियम अटी बसवल्या धाब्यावर !
शाळा स्थानांतरीत करण्याआधी जागेबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. याशिवाय शाळेसाठी जागा, परिसर, इमारत यासह काही नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. मात्र येथे शाळेने अधिकाधिक नियम व अटींची पूर्तता केलेली नाही. या ठिकाणी आधीच बियर शॉपी आहे, तसेच शाळा टिनाच्या शेडमध्ये सुरु आहे. त्यामुळे शाळेला परवानगी मिळणे कठिण होते. मात्र मस्तवाल शाळा प्रशासनाने विनापरवानगीच शाळा सुरु केली, असा आरोप शाळा प्रशासनावर झाला.
पालकांना सूचना व शाळा प्रशासनाला इशारा
मॅकरून शाळेची ही शाखा शासनाची कुठलीही परवानगी न घेता सुरु आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नये. अथवा झालेल्या शैक्षणिक व आर्थिक फसवणुकीस पालक स्वत: जबाबदार राहतील अशी सूचना पालकांना देण्यात आली आहे. तसेच शाळेसमोर लावलेले बॅनर काढल्यास किंवा फाडल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून शाळा प्रशासनावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच या ठिकाणी वर्ग भरवल्यास दर दिवशी दंड ठोठावण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
मॅकरून शाळेची लबाडी सर्वप्रथम मीडियातून समोर आली. ‘वणी बहुगुणी’ने देखील याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांनी या प्रकरणाचा फॉलोअप घेत याबाबत विविध ठिकाणी तक्रार केली होती. मात्र वर्ग सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. मात्र वर्ष 2024-25 साठी या शाखेत प्रवेशासाठी शाळा प्रशासन प्रयत्न करीत असल्याची तक्रार येताच गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला दणका दिला आहे.
पालकांमध्ये चिंता आणि संभ्रम
मॅकरूनची मुख्य शाखा ही वडगाव येथे आहे. तर गंगशेट्टीवार मंगल कार्यालयात सुरु असलेल्या या शाखेत 1 ते 4 वर्ग भरत होते. शहरात शाळा असल्याने पालकांनी या शाखेत प्रवेश घेतला. मात्र आता शिक्षण विभागाने इशारा दिल्याने आता विद्यार्थ्यांचे काय होणार? ज्या विद्यार्थ्यांनी या शाखेत प्रवेश घेतला त्यांना जर वडगाव येथे स्थानांतरीत केले तर काय करावे? अशी विविध चिंता पालकांना सतावत आहे.
Comments are closed.