राजूरा अत्याचार प्रकरणी वणीत महाआक्रोश मोर्चा

मुलींवर हिनकस आरोप करणाऱ्यांंना फाशी द्या: आंदोलकांची मागणी

0 993

विवेक तोटेवार, वणी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील इंफन्ट जीसस स्कुलच्या वसतिगृहातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केला. परंतु झालेल्या अत्याचाराची निंदा करण्यापेक्षा आदिवासी मुलींवर अत्यंत हिन पातळी गाठून आरोप करण्यात आले.  अत्याचार करणाऱ्या नराधमांवर तसेच आदिवासी मुलींवर हिनकस आरोप करण्यांवर गुन्हे दाखल करावे, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी 10 मे रोजी दुपारी विविध आदिवासी संघटना तसेच इतर सामाजिर संघटनांनी वणीत भव्य मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपालला  देण्यात आले.

राजुरा येथील इंफट जीसस स्कुल वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या गुन्ह्यात शामिल असलेल्या दोन महिला व पाच लोकांना अटक करण्यात आली. या घटनेबाबत संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह आ विजय वडेट्टीवार, सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी 22 एप्रिल रोजी चंद्रपुरातील एका हॉटेलात पत्रकार परिषदेत मुलीचे पालक शासकीय मदतीसाठी तक्रार करीत असल्याचे अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले. या तिघांनाही महिला आयोगाकडून जाब विचारण्यात आला आहे. परंतु त्यांच्या जाबाने समाधान न झाल्याने त्यांच्यावर ऍक्टरोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिघांना सहआरोपी करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी ही मागणी आता जोर धरत आहे. या मागण्यामध्ये या अत्याचारात शामिल असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा दयावी, या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, पीडितेस कायद्यानुसार 3 लाख रुपये देण्यात यावे, या केसचा निकाल फास्ट ट्रॅक कोर्टानुसार लावण्यात यावा, पीडितेच्या संपूर्ण शिक्षण व सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी सरकारने घ्यावी. या मागण्याचे एक निवेदन शुक्रवारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना देण्यात आले आहे.

या घटनेचा निषेध व मागण्या मान्य करून घेण्यासाठी आदिवासी बांधव व अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला. मोर्चाची सुरवात दुपारी 2 वाजता भिमालपेन भिवसेन देवस्थानापासून झाली. तेथून मार्गक्रमण करीत हा मोर्चा टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, भगतसिंग चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर धडकला. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी काँ. गीत घोष संतोष चांदेकर, ऍड. अरविंद सिडाम, मनिषा तिरणकर, पुष्पा आत्राम, सुरेश राजगडकर, नैताम रमेश मडावी, संतोष चांदेकर, विनोद आत्राम, सुभाष उईके, बाबा राव मडावी, नितराज नैताम, सुदर्शन टेकाम, रमेशराव मडावी, संतोष भादिकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या मोर्चा भारतीय सैवैधानिक हक्क परिषद, अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषद, आदिवासी जनजागृती युवा संघटना, वीरांगना राणी दुर्गावती महिला संघटना, बिरसा ब्रिगेड, अखिल भारतीय आदिवासी परिषद, शामादादा ब्रिगेड, विदर्भ आदिवासी विकास परिषद, क्रांतिवीर बाबूरावजी शेडमाके युवा समिती गणेशपूर, भिमालपेन भिवसेन देव समिती वणी, क्रांतिवीर बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालय वणी, गोंडवाना टायगर संघटना मारेगाव, नॅशनल आदिवासी युथ असोसिएशन मारेगाव, आदिवासी विकास संघटना झरी जामनी, बिरसा क्रांती दल, आदिवादी परधान समाज संघटना, आदिवासी इम्प्लाइस फेडरेशन, आदिवासी एकता परिषद, जय सेवा महिला बचत गट राजूर, गोंडवाना संग्राम परिषद इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.

Comments
Loading...