तुमचं एक मत मोदीजींच्या कार्याला आशीर्वाद देईल – मुनगंटीवार

भाजपा आणि महायुतीच्या वणी कार्यालयाचे थाटात उद्घाटन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतीय जनता पार्टीला विकासकार्याची खूप मोठी परंपरा पूर्वीपासून आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतमातेच्या सेवेत अर्पण केलं. तोच वारसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चालवत आहेत. त्यांच्या या कार्याला जनतेने बळ द्यावं. भारतीय जनता पार्टीला मत देऊन त्यांना आशीर्वाद द्यावा. असं प्रतिपादन चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

वणी बसस्थानकासमोरील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विजय पिदुरकर, विजयबाबू चोरडिया, तारेंद्र बोर्डे, विनोद मोहितकर, दिनकर पावडे, वसुकेत पाटील, प्रा. म. गो. खाडे तसेच मित्रपक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, मोदी यांच्या नावात एम आहे. त्यांच्याही नावात एम आहे. एमचा अर्थ मदर म्हणजेच आई होतो. जी आपल्या लेकरांचं दुःख पाहू शकत नाही. तोच प्रयत्न आम्ही करणार आहोत. स्वतंत्र झाल्यानंतरही भारताची व्हावी तशी प्रगती झाली नाही. ती करण्याचा भाजपा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वासह सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत.

भाजपाचं काम पाहून विरोधी पक्षातले नेतेदेखील भाजपाचे कौतुक करीत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे एक दिव्य स्मारक उभं केलं. लंडनमध्ये असताना बाबासाहेबांचं घर होतं त्याचंदेखील स्मारक म्हणून मोठं काम केलं. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळते. भाजपाने शेतकऱ्यांसाठी विविध योजना केल्यात. त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. आज मोदींव्यतिरिक्त कुणी प्रधानमंत्री होण्याच्या पात्रतेचा आहे काय? याचा विचार करा. आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत अशी विनंती मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात केली.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा गुणगौरव केला. ते म्हणाले की, मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे विकासपुरुष आहेत. ते दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. आज आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. 19 तारखेला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आहे. ही शेवटच्या फिनिशिंगची वेळ आली आहे. मागील वेळेसही वणीतून भाजपाला भरपूर मत मिळालीत. त्याहीपेक्षा जास्त मते यावेळेस मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भाजपाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजपाला विजय मिळवून दिला. वणी शहराचा आपला किल्ला अभेद राखला.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी गौरवोद्गार काढलेत. तेही म्हणाले की, मुनगंटीवार हे वेगळ्या स्टाईलने काम करतात. त्यांनी आतापर्यंत खूप मोठे योगदान दिलं. विकासनिधी दिला. ते प्रामाणिकपणे शब्द पाळणारे नेते आहेत. सर्वसामान्यांचे नेते आहेत. त्यामुळे आपण त्यांना साथ दिलीच पाहिजे. कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक संजय पिंपळे शेंडे यांनी केले यावेळी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.