शाळेच्या मधल्या सुट्टीतून 2 मुली झाल्या गायब

फूस लावून पळवून नेणारे दोघे गजाआड

विवेक तोटेवार, वणी: शाळेत शिकणा-या दोन मुलींना फूस लावून पळवून नेणा-या दोन तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी मुलींच्या पालकांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी 2 दिवसात शोध घेऊन आरोपींना अटक केली व मुलींना पालकांच्या ताब्यात दिले. या दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही पीडित अल्पवयीन मुली या तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहेत. त्या आठव्या वर्गात शिकतात. शनिवारी 30 मार्च रोजी यातील एक मुलगी ही मैत्रिणीसोबत मधल्या सुट्टीत बाहेर जाऊन येतो, असे बहिणीला सांगून गेली होती. परंतु शाळा सुटली तरी दोघीही घरी परतल्या नाही.

तिच्या कुटूंबियांना आपल्या नातेवाईकांकडे व गावात शोध घेतला परंतु दोघीही मिळून आल्या नाही. शेवटी 1 एप्रिल रोजी वडिलांनी शिरपूर ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध फूस लावून पळवून नेल्याची कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला.

पोलिसांनी एक टीम चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे पाठवली व तेथून दोन्ही मुली व आरोपी राहुल मारोती मडावी (24) रा. खैरगाव ता. कोरपना व निखिल सिडाम (25) रा. खैरगाव ता. कोरपना यांना अटक केली. त्यांच्यावर कलम 363, 376 (3), 376 (5), सहकलम 3, 4 पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.