महिला बचतगटांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सोमवारी महापरिषद

कर्जमुक्ती झाल्याशिवाय थांबणार नाही... डॉ. महेंद्र लोढा यांचा इशारा

0

बहुगुणी डेस्क, वणी: महिला बचतगटांना संपूर्ण कर्जमुक्त करा. राष्ट्रीय बँकांमार्फत महिला बचतगटांना कर्ज पुरवठा करण्यात यावा. महिला बचतगटांचे सबलीकरण आणि सशक्तीकरण यासाठी सरकारने महिला बचतगटांना उद्योगासाठी प्रशिक्षित करावे. मायक्रोफायनान्स व खाजगी बँकांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी. पंतप्रधान मुद्रा लोन ची कडक अंमलबजावणी करावी. प्रत्येक महिला बचतगटांना तत्काळ उद्योग निर्मितीसाठी बिनव्याजी पुरवठा करावा. अशा मागण्यांसाठी जनसेवक तथा आदिवासी मित्र पुरस्कारप्राप्त डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात सोमवारी महिला बचतगटांची महापरिषद होत आहे

सोमवार 9 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाण्याच्या टाकीजवळ शासकीय मैदान येथे ही महिलांची महापरिषद होईल. डॉ. महेंद्र लोढा यांच्यासह पुणेयेथील यशदाच्या बचतगट प्रशिक्षक नीलिमा काळे बचतगटांना मार्गदर्शन करतील. एका पत्रकानुसार डॉक्टर महेंद्र लोढा यांनी बचतगटाच्या विविध समस्या मांडल्या आहेत. त्यानुसार सरकारच्या चुकीच्या जनताविरोधी धोरणाचा फटका सर्वसामान्य माणसांसोबत महिला बचतगटांना बसत असल्याचं विदारक वास्तव्य त्यांनी मांडलं.

महिला सबलीकरण केवळ नावापुरतीच असून महिलांच्या मतांचे राजकारण सरकार महिला बचतगटाच्या माध्यमातून करताना दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं. एकीकडे महिलांचे सशक्तीकरण आणि सबलीकरण करण्याचे पोकळ आश्वासन महिलांना द्यायचे, तर दुसरीकडे त्यांना कुठल्याच राष्ट्रीय कृत बँकांमधून बचतगटासाठी साधे कर्जदेखील द्यायची नाही. महिलांच्या सशक्तीकरणासाठी कुठलेच महत्त्वाचे पाऊल उचलायचे नाही. ही सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचं डॉ. लोढा यांनी पत्रकात म्हटलं आहे.

बचतगटांनी आता आपल्या समस्या मांडून लढा पुकारला पाहिजे, असं डॉ. महेंद्र लोढा यांनी पत्रकात नमूद केलं. वणी, मारेगाव, झरीजामणी महिला बचतगट हक्क व संरक्षण कृती समितीच्या वतीने सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी महिला बचतगटाच्या न्याय्य हक्कांसाठी वणी येथे ही महिलांची महापरिषद आयोजित करण्यात आल्याचे डॉ. महेंद्र लोढा यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना म्हटलं.

या मेळाव्याला उपस्थित राहण्याची विनंती वणी, मारेगाव, झरीजामणी महिला बचतगट हक्क व संरक्षण कृती समितीच्या पत्रक प्रकाशक जिजाबाई कोयचाडे, रेखा दडांजे, सुरेखा आत्राम यांच्यासह सर्व सदस्यांनी विनंती केली आहे. महिला भगिनींच्या न्यायाचा हा लढा महिलांनी महिला बचत गटाची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय थांबणार नाही असा इशारा डॉक्टर महेंद्र यांनी दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.