महिला दिनानिमित्त शाळा क्र. 8 मध्ये विविध कार्यक्रम

वेशभूषा स्पर्धा, पैठणी मानकरी, आनंद मेळावा, पुस्तक भेट उपक्रम

बहुगुणी डेस्क, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक आठ, वणी येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नगराध्यक्ष विद्या आत्राम होत्या. विशेष अतिथी म्हणून शिक्षण सभापती सोनाली निमकर, प्रमुख अतिथी बांधकाम सभापती लवलेश लाल, नगरसेविका पूजा रामगिरवार, नगरसेवक मनोज सिडाम, प्रशासन अधिकारी गजाननराव कासावार, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनिषा शिवरकर व उपाध्यक्ष कार्तिक रुईकर उपस्थित होते.

शाळेच्या वतीने महिला पालकांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम क्रमांक काजल श्रीकांत उरकुडे तर द्वितीय क्रमांक वर्षा मडावी यांनी मिळवला. “कोण जिंकेल पैठणी?” या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेतला. यात विशाखा पानघाटे पैठणीच्या मानकरी ठरल्या. शाळेतर्फे आशा सेविका सोनाली निमसटकर व अंगणवाडी सेविका वर्षा मडावी यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या पालक सीमा धानोरकर, नीता चांदेकर, सुनीता डूबे, सोनू कनाके, मनिषा शिवरकर, सुवर्णा परचाके यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

आनंद मेळाव्याने आणली रंगत
या कार्यक्रमात “खरी कमाई” अंतर्गत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून मेळाव्यात रंगत आणली. वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण गजाननराव कासावार यांनी केले. “मी असा घडलो” या उपक्रमांतर्गत नगराध्यक्ष विद्या आत्राम यांनी बालपणापासून नगराध्यक्षा पदापर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना व पालकांना सांगितला. महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शाळेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक भेट देण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्या आत्राम, शिक्षण सभापती सोनाली निमकर, नगरसेविका पुजा रामगिरवार, नगरसेवक लवलेश लाल, मनोज सिडाम तसेच शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सुनीता जकाते, किरण जगताप, नीलिमा राऊत यांचा सन्मान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन अविनाश तुंबडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार काकासाहेब जायभाये यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यशस्वीतेसाठी दीपक भोयर, निशा कावळे व शाळेचे सर्व पालक यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.