एकाच दिवशी दोन विवाहित तरुणाची आत्महत्या, परिसरात खळबळ

एकाने विहिरीत उडी घेतली, तर एकाने घेतला गळफास

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील बोर्डा व मारेगाव तालुक्यातील मार्डी या दोन गावांमध्ये सोमवारी (दि. 9 मार्च) दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. यातील एकाने विहिरीत उडी घेऊन तर एकाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या दुहेरी घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.

प्रफुल्ल बंडू आत्राम (वय 39) हे मार्डी येथील रहिवासी होते. ते शेतकरी करायचे. सोमवारी सकाळी सुमारे 11.30 वाजता त्यांनी घरातील स्वयंपाकघरातील टीनच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवले. ही घटना त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आली. त्याने तात्काळ याची माहिती त्याच्या काकांना दिली. घरात पाहणी केली असता प्रफुल्ल आत्राम मृतावस्थेत होते. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शेतीत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.  मृत प्रफुल्ल आत्राम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे मार्डी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विहिरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या 
वणी पोलीस स्टेशन हद्दीतील बोर्डा येथे सोमवारी (दि. 9 मार्च) दुपारच्या सुमारास एका 36 वर्षीय तरुणाने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गणेश शंकर सुरपाम (वय 36, रा. बोर्डा) असे मृतकाचे नाव आहे. दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती वा-यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा तपास वणी पोलिसांकडून सुरू आहे. गणेश सुरपाम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ व वडील असा आप्तपरिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दोन वेगवेगळ्या आत्महत्यांच्या घटनांनी ग्रामीण भागातील आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आत्महत्या केलेले दोन्ही व्यक्ती विवाहित व तरुण होत्या. एकाच दिवशी दोन कुटुंबांनी आपल्या कर्त्या पुरुषाला गमावल्याने परिसर हादरला आहे. या दुर्दैवी घटनांनी समाजाला गंभीर विचार करायला भाग पाडले आहे. (Image AI Generated)

 

Comments are closed.