सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरात गुळाला वर्षभर मागणी असते. आहारात गुळाचा वापर होतोच; पण विविध ठिकाणीदेखील गूळ मोठ्या प्रमाणात वापरला जातो. लग्नसमारंभामध्ये मुलीचा मामा बोळवणात मुलीला गुळाचे महालिंग देतो. वणी परिसरातील संत जगन्नाथ महाराजांच्या मठांमध्येदेखील जो काढा तयार होतो तो गुळाचाच असतो. अनेक लोक ‘‘गूळतुला’’देखील करतात. यात एखाद्या व्यक्तीच्या वजनाइतके गुळाचे दान करतात. यासाठी वाढदिवस, मंगलप्रसंग असे कोणतेही औचित्य असू शकते. त्यामुळे वणी परिसरात गुळाला वर्षभर मागणी असते. संक्रातीमध्ये आणि लोणच्याच्या सिझनमध्ये साधारणतः वणीकरांना 8,000 ते 10,000 किलो गूळ लागतो.
पूर्वी अनेकजण विशेष वाहने उपलब्ध नसल्यामुळे पायी प्रवास करत. घरात आल्याबरोबर त्यांच्या हातावर गूळ ठेवायचे व मग पाणी प्यायला द्यायचे. प्रवासाचा पूर्ण शीण याने जात होत होता. गूळ एनर्जेटिक असल्यामुळे याचा आहारात विविध माध्यमातून समावेश आजही होतो. गूळ हा साखरेपेक्षा नक्कीच सिनिअर आहे.
व ऱ्हाडात गुळाचा चहा खेड्यापाड्यात आवडीने प्यायला जायचा. आताही काही शौकीन आहेत. गुळाच्या पोळ्योदखील चवीने खाल्या जातात. वर्षभर गुळाचा आहारात वापर होत असला तरी, 14 जानेवारीला होणाऱ्या संक्रातीची चाहूल लागली की गुळाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होते.
अंकापल्ली गूळ हे नाव बरेच जण ऐकून आहेत. आंध्रपदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील हे गाव आहे. गुळासाठी जगभरातील बाजारपेठेत मुजफ्फरनगर टॉपवर तर विशाखापट्टणम सेकंडवर आहे. इथले मीठ आणि ऊस प्रसिद्ध आहे. या अंकापल्ली गावातील ऊस उत्पादक घरोघरी गूळ काढतात. येथील गुळाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्राचा विचार करता कोल्हापुरी गुळाची चटकन आठवण येते. अनेक वर्षांपासून कोल्हापुरात पारंपरीक पद्धतीने गूळ तयार करण्याचे काम सुरू आहे. कोल्हापुरातील गूळ उत्पादकांसाठी छत्रपती शाहू महाराजांनी 1895 मध्ये शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ सुरू केली.
गूळ म्हणजे गोड द्रवाची घन अवस्था. ऊस, ताड, माड आदींचा रस काढला जातो. तो तापविला जातो. हा रस थंड झाला की त्याचा गूळ तयार होतो. दक्षिण पॅसिफिक महासागरातील बेटांतून ऊस आला असे म्हणतात. रसापासून गूळ व साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान भारतीयांजवळ प्राचीन काळापासून होते.
गूळ या शब्दाची व्युत्पत्ती लासेन नावाचा संशोधक बंगालमधील गौर नावाचे शहर सांगतो. तसेच अनेक व्युत्पत्ती गुळाच्या सांगितल्या जातात. बौद्धग्रंथांमध्येही गुळाच्या वापरासंदर्भात उल्लेख आढळतात. सेल्युकस नायकेटॉरचा वकील मेगॅस्थिनीज सम्राट चंद्रगुप्ताच्या दरबारात होता. त्यानेदेखील गुळाचे वर्णन अत्यंत मधुर असेच केले आहे. गुळाला संस्कृतमध्ये गुड, बंगाली, असमिया, ओडिया, भोजपुरी, मैथिली, उर्दू आणि पंजाबीत गुड़, सिन्धीत गुढ, कोंकनीत गोड, मलयाळम भाषेत शर्करा किंवा चक्कर, गुजरातीत गोल, राजस्थानीत गोल गूल, कन्नड भाषेत बेल्ल, तेलुगुत बेल्लम्, तमिळमध्ये वेल्लम्, नेपाळीत भेली आणि इंग्रजीत जॅग्गेरी म्हणतात.
गुळात सुक्रोज 59.7 टक्के, ग्लुकोज 21.8 टक्के, खनिज २६ टक्के, पाणी 8.86 टक्के असतं. सोबतच कॅल्शियम, फॉस्परस, मॅग्नेशियम, लोह व ताम्र याचेही प्रमाण त्यात असतंच. गुळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात. गुळामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हिमोग्लोबीन योग्य राहते. रक्ताची कमतरता दूर होते. स्मरणशक्तीतही वाढ होते. खोकल्याचा त्रास असला की गूळ खातात. फक्त मधुमेहींनी गुळाबाबत काळजी घ्यावी. अलीकडे रासायनिक प्रक्रिया केलेला गूळ येत असला तरी सेंद्रीय व नैसर्गिक तत्त्व असलेला गूळच खाणे अधिक योग्य. जुन्या गुळात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. थंडीच्या दिवसांत, हिवाळ्यात गूळ उष्ण असल्यामुळे त्याचा वापर अधिक करतात.
संक्रातीला तीळ आणि गूळ खातात. एकमेकांना देतात. आरोग्यासाठी खरोखरंच ते उत्तम आहे. मात्र वर्षभरातील कटुता, द्वेष, घृणा, गैरसमज जर याने जाऊन नात्यांतील गोडवा वाढत असेल तर अतिउत्तमच. गूळ उष्ण असतो. या संक्रातील नात्यांची ऊब आणि संबंधांतील गोडवा नक्कीच वाढवूया. गूळ अनेक गुणांनी समृद्ध आहे. त्यामुळे गुळाबद्दल एक निर्विवाद सत्य आहे की, ‘‘गूळ इज रिअली गूड’’.
‘‘गूळ इज रिअली गूड’’.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.