सुप्रसिद्ध ब्रिटिशकालीन मामा तलावाला मिळाले जीवनदान
रफीक कनोजे, झरी: मुकुटबन येथील मामा तलाव शिंगाड्यासाठी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. तलावातील पाणी कमी झाल्याने हा सुप्रसिद्ध तलाव आटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र शिंगाड्यासाठी प्रसिद्ध असलेला हा तलाव शाबुत राहावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. या तलावात आता पाणी सोडले गेले असल्याने तलावाला जीवनदान मिळाले आहे.
झरी तालूक्यातील मुकुटबन येथील मामा तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. येथे पिकवलेल्या शिंगाड्याला नागपूर, अमरावती , वणी, आदिलाबाद, चंद्रपूर, पांढरकवडा सह इतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तलावातील शिंगाडे व मासे विक्री करून २५० कुटुंबाचे उदरनिर्वाह होतो. यावर्षी पावसाने दडी मारल्याने तलावात पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अर्धा तलाव कोरडा झाला आहे. त्यामुळे हा तलाव येत्या एप्रिल महिन्यात हा तलाव कोरडा पडण्याची शक्यता होती. त्या कारणाने शिंगाड्याचे बीज व मासे सुद्धा जिवंत ठेवणे कठीण होते. ज्यामुळे मुकुटबन येथील २५० भोई समाजाच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता बळावली होती.
हा तलाव शाबुत ठेवण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच शंकर लाकडे, उपसरपंच अरुण आगुलवार व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत तर्फे सामान्य निधीतुन तलावात पाणी सोडण्याकरिता एक बोअरवेल मारून दिली. सध्या तलावातील शिंगाडा बीज वाचवण्याकरिता तलावात पाणी सोडणे सुरु आहे. तसेच गावात पाणी टंचाई भासल्यास याच बोअरचे पाणी गावकर्यांसाठी उपयोगी पडणार आहे. उन्हाळ्यात जनावरकरिता सुद्धा पाणी मिळणार आहे.
बोअरवेल मारल्याने भोई समाजामध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे. पाण्याकरिता मारलेला बोअर गावकर्यासाठी उपयुक्त ठरून पाणी टंचाईवर मात करू शकते हे निश्चित:सदर बोअरची पूजा सरपंच शंकर लाकडे यांच्या हस्ते करून तलावात पाणी सोडण्यात आले. त्यावेळी उपसरपंच अरुण आगुलवार, अध्यक्ष रामलू संदरलावार, चक्रधर तिर्थगिरीकर, मधुकर चेलपेलवार , संदीप विचू, सुरेश ताडुरवार, अशोक कल्लूरवार, रामदास पारशिवे, सत्यनारायण यनगंटीवर, मनोज अडपावार, बापूराव जिन्नावार, किशोर गोनलावार व भोई समाजबांधव , गावकरी उपस्थित होते.