विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मंदर येथे सोमवारी 17 सप्टेंबरला रात्री काही अज्ञात चोरट्यांनी एका घराचं कुलूप तोडून चोरी केल्याचे वृत्त आहे. यात सुमारे 11 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांत दहशतीचेवातावरण निर्माण झाले आहे.
हिरामण नामदेवराव आस्वले (36) हे मंदर येथे राहतात. त्याच्या घराला लागूनच त्यांचे मोठे भाऊ व आईवडील राहतात. सोमवारी रात्री त्यांचा भाऊ व हिरामण आपल्या घराला कुलूप लावून हॉलमध्ये झोपले. रात्री 1 नंतर ते दोघेही झोपी गेले. सकाळी साडेपाच वाजता जग आल्यानंतर बघितले की, घराचा दरवाजा उघडा आहे व कुलूप तुटून पडले आहे.
त्यांनी आत जाऊन बघितले असता अलमारीतून सोन्याची पोत, सोन्याचा गोप, कानातील सोन्याची वेल असा एकूण 11400 रुपयांच्या वस्तू चोरी झाल्याचे समजले. अस्वले यांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दिली . त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीवर कलम 457, 380 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हेड कॉन्टेबल डोमाजी भादिकर करीत आहे.
विठ्ठलदास देवचंद दुकान फोडणारे चोरटे अद्याप मोकाट
तीन दिवसां अगोदर वणीतील विठ्ठलदास देवचंद नामक दुकानात चोरी झाली होती. यात चोरट्यांनी लाखो रुपयांचे मोबाईल लंपास केले होते. या चोरीच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच पुन्हा मंदर येथे चोरी झाल्याचे समोर आले आहे. ऐन सणासुदीच्या काळात अशा धाडसी चोऱ्या होत असल्याने वणीकरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे मंदर येथे हिरू बुच्चे यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती आहे. परंतु वृत्त लिहतपर्यंत त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान वणी पोलिसांसमोर आहे.