मांगली दारूबंदी: प्रबोधन करणाऱ्या महिला व पुरूषांना जिवे मारण्याची धमकीी

0

सुशील ओझा, झरी: मांगली (हिरापुर) येथील परवाना धारक देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता उद्या शनिवार २४ मार्चला मतदान होणार असून या निवडणुकीकरीता शासन स्तरावर संपूर्ण तयारी झाली आहे. दारूविरोधात महिलांचा प्रचार आणि प्रबोधनामुळे देशी दारू दुकानाविरोधात चांगलीच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महिलांना देवदर्शनाचं प्रलोभन दाखवून मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखल्याचे समोर येत आहे. ज्या महिला देवदर्शनाला जाण्यास तयार नाही अशा महिलांना यवतमाळ येथील गुंड बोलावून मारण्याची धमकी दिली जात असल्याचं समोर येत आहे. एवढेच नव्हे तर दारूबंदीकरीता काम करणाऱ्या महिलांसोबत गावातील जे प्रतिष्ठित व्यक्ती मदत करीत आहे त्यांना सुद्धा उडवून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. ज्यामुळे गावातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत गावातील माजी पंचायत समिती सदस्य सुरेश मानकर, सुनील ढाले कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, टिपेश्वर मादेवार ग्रामपंचायत सदस्य, नरेंद्र राखूंडे, श्रीकांत चामाटे, जीवन माशटवार, दीपक कांबळे सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाब वाघ यांची पोलीस ठाण्यात भेट घेतली. दारूबंदीबाबत काम करणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे याची ही माहिती त्यांनी ठाणेदारांना दिली. तसेच गावातील एका सभ्य इसमालाही काही लोकांनी दारूबंदीचा विषय काढून मुद्दाम मारहाण केल्याचे सांगितले. यावरून ठाणेदार वाघ यांनी रितसर तक्रार द्या मी कार्यावही करतो असे सांगितले.

दारूबंदीच्या मतदानाकरिता प्रतिष्ठित व्यक्तींना व महिलांना मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने पोलिसांना सुद्धा मोठे आवाहन आहे. मतदानाच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये, महिलांना  धमकवणाऱ्याकडे लक्ष देणे ह्या गोष्टींकडेही पोलिसांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी बाहेरील पोलीस पथक  बोलवावे लागणार आहे. धमकी देऊन मतदान कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविषयी गावातून प्रचंड संताप व्यक्त होत असून मतदान करून आम्ही आमची ताकत दाखवून देऊ असा निर्धार महिलांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.