श्रमदानातून मांगुर्लावासीयांनी केली पुलाची दुरुस्ती
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ग्रामस्थांचा खटाटोप
सुशील ओझा, झरी: झरी ते मांगुर्ला (बु.) या पाच कि.मी. मार्गावरील पुलाची एक बाजू पावसाच्या पाण्याने खचल्यामुळे गावाचा संपर्क तुटला होता. परिणामी, झरी येथे शिक्षणासाठी पायदळ जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि प्रवाशांना मोठा त्रास होत होता. ग्रामस्थांनी ही बाब लक्षात घेऊन श्रमदानातून खचलेल्या पुलाची दुरुस्ती केली आहे.
मांगुर्ला (बु.) ते झरी या ५ कि. मी. जंगलमय रस्त्याची मागील अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने प्रवासी व वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सोमवारी तर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्त्यासह पुलाची अवस्था बिकट झाली. मांगुर्ला (बु.) येथून झरी जाण्यासाठी कुठलेही खासगी वाहन अथवा बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पायी जावे लागत होते.
रस्त्याची बिकट अवस्था आणि खचलेला पूल यामुळे मानव विकास मिशनची बस सेवा उपलब्ध होत नव्हती. वेळोवेळी प्रशासनाकडे बसची मागणी केल्यानंतर अडसर ठरत आलेल्या मार्गावरील खचलेल्या पुलाचे काम ग्रामवासी व पालकांनी श्रमदानातून पूर्ण केले..
मांगुर्ला (बु.) ते झरी मार्गाच्या दुरवस्थेबाबत संबंधित प्रशासनाकडे मागणी करूनही त्याला केराची टोपली दाखविली जात होती. अखेर ग्रामवासीयांनी व पालकांनी श्रमदानातून रस्त्याचा प्रश्न निकाली काढला आहे. आता प्रशासनाने तत्काळ बससेवा सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..