निकेश जिलठे, वणी: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जस जशी निवडणुकीची तारिख जवळ येत आहे. तस तसे राजकीय हालचालींना वेग येत आहे. वणी विधानसभा मतदारसंघात सध्या उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. या रस्सीखेचमध्ये आता मनिष सुरावार यांनी ही उडी घेतली आहे. वणीतील पद्मावती रेसिडेन्सी येथे शुक्रवारी मनिष सुरावार यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीत वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मनिष सुरावार यांचे समर्थक उपस्थित होते. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच येत्या दोन ते तीन दिवसात समर्थकांचा मेळावा घेण्याचेही निश्चित करण्यात आले.
मनिष सुरावार यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेद्वारे राजकारणात प्रवेश केला. राज ठाकरे विद्यार्थी सेना सांभाळत असताना यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. पुढे राज ठाकरे यांनी पक्ष सोडल्याने त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मात्र पुढे अंतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते भाजपमध्येच आहेत. मात्र पक्षाच्या कार्यक्रमात ते विशेष सक्रिय नाहीत.
निवडणूक जवळ येताच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी केली असून त्याद्वारे मोर्चेबांधणी करण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या दोन तीन दिवसांमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याने भाजपमधली अंतर्गत बंडाळी समोर आली आहे.
या संदर्भात मनिष सुरावार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बैठक तसेच मेळाव्याबाबत पुष्टी दिली. बैठकीत आगामी निवडणूक लढायची की नाही याबाबत चर्चा झाली असून मेळाव्यामध्ये निवडणुकीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार. अशी माहिती त्यांनी दिली.
निवडणुकीचे पडघम वाजताच रोज नवनवीन उलथापालथ मतदारसंघात होताना दिसत आहे. सध्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकांचा वेग वाढला आहे. मनिष सुरावार यांच्या बैठकीमुळे ते बंडाच्या पावित्र्यात तर नाही ना या चर्चेेेेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. पक्ष त्यांची मनधरणी करणार की ते बंड करणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. आता मेळाव्यात ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.