सुप्रसिद्ध कव्वाल मनोहरदीप ‘रुसवा’ भगत यांचे निधन

क्रांतीकारी विचारांचा प्रवाह अखेर थांबला...

0

निकेश जिलठे, वणी: ‘भीमवाडी’ या भीम आणि बुद्धगीतांच्या अल्बमने अख्या महाराष्ट्राला वेड लावणारे सुप्रसिद्ध कव्वाल मनोहरदीप ‘रुसवा’ भगत यांचे शुक्रवारी दुपारी 1 वाजता वरोरा येथे त्यांच्या राहत्या घरी आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रवाह आपल्या गायकीतून मांडला. भीम व बुद्ध गीतांच्या माध्यमातून त्यांनी आंबेडकरी सांस्कृतिक चळवळ सुरू ठेवली.

महराष्ट्रात भीम आणि बुद्ध गितांचं नाव आलं की त्यात जी काही नावं डोळ्यांसमोर येतात त्यात एक महत्त्वाचं नाव म्हणजे मनोहरदीप रुसवा यांचं. वणी जवळील राजूर इथे त्यांचा जन्म झाला. राजूरमध्ये वेकोलि इथे ते फोअरमन या पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते वरोरा इथे स्थायिक झाले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांचे ब्रेन हॅम्रेज झाल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. पंधरादिवसांआधीच ते उपचारानंतर घरी परतले होते. मात्र त्यानंतर ते आजारीच होते. अखेर शुक्रवारी 16 नोव्हेंबरला दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

रमाईचं कुंकु, भीमवाडी, चलो बुद्ध की ओर, चला भीमवाडी, भीमवाडीचा रंग निळा इत्यादी त्यांच्या कॅसेटने केवळ विदर्भच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावंल होतं. यात मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा अल्बम म्हणजे भीमवाडी. 1993 साली हा अल्बम टिप्स या सुप्रसिद्ध कंपनीने प्रकाशित केला होता. भीमगितांच्या अल्बमचे सर्व रेकॉर्ड या अल्बमने तोडले होते. आजही बौद्ध समाजातील लग्न प्रसंग असो किंवा इतर कार्यक्रम हा कार्यक्रम भीमवाडीच्या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही यावरून या अल्बमचं गारूड किती असेल हे लक्षात येते.

संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी भीम, बुद्ध गीत आणि कव्वालीचे हजारो कार्यक्रम केलेत. त्यांच्या कार्यक्रम आणि गर्दी हे एक समिकरण बनलं होतं. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, प्रकाशनाथ पाटणकर, किसन खरात, इत्यादी प्रसिद्ध कव्वाल यांच्यासोबत त्यांनी कार्यक्रम केले. अलिकडे त्यांनी आजारपणामुळे कार्यक्रम थांबवले होते. टिप्स, विनस, टी सिरीज इत्यादी कॅसेट कंपनीने त्यांचे अल्बम प्रकाशित केले होते.

आंबेडकरी सांस्कृतिक चळवळी सोबतच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यातही मोठा सहभाग असायचा. राजूर येथील बुद्ध विहार उभारण्यासाठी त्यांनी शेकडो कार्यक्रम केले. कार्यक्रमातून प्राप्त झालेल्या निधीतून बुद्ध विहार बांधण्यास त्यांनी मोठी मदत केली होती. मनोहरदीप रुसवा यांच्या निधनाने आंबेडकरी सांस्कृतिक चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्यावर उद्या शनिवारी दुपारी बारा वाजता वरोरा येथील त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. 

मनोहरदीप ‘रुसवा’ भगत यांचे काही सुप्रसिद्ध भीमगीते
आई म्हणे लेकराला…
पेटता पेटता बोलली चिता…

आली जयंती जयंती…
गरीबी जरी संसारात होती…
थांबवा जरा गाडी हीच आहे भीमवाडी…

Leave A Reply

Your email address will not be published.