ह. भ. प. मनू महाराज यांच्या आज सोमवारी वाढदिवस
मनू उर्फ मुन्नालाल तुगनायत ह्यांचे वयाच्या 66 व्या वर्षांत पदार्पण
बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांचे आराध्य दैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थानचे अध्यक्ष, श्री यज्ञसेवा समितीचे अध्यक्ष व जैताई देवस्थान कार्यकारिणी सदस्य मुन्नालाल तुगनायत उपाख्य ह.भ.प. मनू महाराज यांचा सोमवारी 26 ऑक्टोबरला जन्मदिवस आहे. त्यांनी वयाची 65 वर्षे पूर्ण करून 66 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 26 ऑक्टो.1955 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी एम कॉमपर्यंत शिक्षण पूर्ण करून वडलोपार्जित व्यापार सांभाळला. या काळात त्यांनी वणी व्यापारी असोशियन व वितरक संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले.
ह.भ.प.मनू महाराज यांनी सन 2005पासून धार्मिक क्षेत्रात सक्रिय प्रवेश केला. श्रीमद्भागवतकथा, श्रीरामकथा, प्रवचन, सुंदरकांडपाठ, कीर्तनाच्या कार्यक्रमांची सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत विविध ठिकाणी सुंदरकांड, कथा, कीर्तन, प्रवचने दिलीत.
विशेष म्हणजे मनू महाराज कार्यक्रमासाठी कोणतेही मानधन घेत नाही. ग्रंथांपासून येणाऱ्या रकमेतून ते गरीब मुलींचे लग्न लावण्याचे पुण्यकार्य करतात. मागील 15 वर्षांपासून ते मोक्षधाम सेवासमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात मोक्षधाम परिसरात सुशोभीकरण आणि अनेक विकास कामे पूर्ण झाले. निष्काम सेवा करणारे मनू महाराज तुगनायत यांना ‘वणी बहुगुणी’ परिवारातर्फे वाढदिवसाच्या सदिच्छा.
सेवा हीच ईश्वरभक्ती
आराध्य दैवत श्री रंगनाथस्वामी, माता जैताई यांचे आशीर्वाद व वणीकर जनतेच्या प्रेमाने मी निरोगी जीवन जगत आहे. देवाची भक्ती आणि कथावाचन जीवन जगण्यासाठी उत्स्फूर्तता प्रदान करत राहते. कीर्तन, प्रवचन आणि अन्य सेवा देण्याची मला संधी मिळते. हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचं मी मानतो. ही सेवा करण्याचं बळ वाढत राहावं, अशी मी प्रार्थना करतो.ह.भ.प.मनु महाराज उपाख्य मुन्नालाल तुगनायत
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)