देवीला वाहिलेल्या बोकडाचं मग काय झालं !  

इंग्रजकाळात खरेखुरेच वाघ फिरायचे या देवीजवळ

0

सुनील इंदुवामन ठाकरे , परतवाडा: अमरावती: पूर्वी इथं तोफखाना होता. ब्रिटीशांची छावणी या भागात होती. गव्हर्नमेंट फार्म आणि आजूबाजूला मोकळा परिसर होता. परतवाडा शहराचा विकासदेखील झाला नव्हता. अचलपूरचाच हा भाग समजला जायचा. या छावणाीत अनेक भारतीय सैनिक होते. या सैनिकांचं श्रद्धेचं स्थान होतं वाघामाता.

तेव्हाच्या जंगलात असलेली ही ग्रामदेवता दुर्गम होती. घनदाट जंगल, वाघ, साप, विंचू अशा अनेक अडचणीदेखील होत्या. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार होत राहिला. आज केवळ अचलपूर-परतवाडाच नव्हे तर धारणी, बैतूल, भैसदेही, दर्यापूर, अंजनगावसह महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर भाविक येतात. अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात दसरा मैदान, लाल पूल परिसरातील श्री सिद्धक्षेत्र वाघामाता संस्थानचा नवरात्राैत्सव थाटात सुरू झाला.

ब्रिटीशांनी वळवली बिच्छन नदी…..

वाघामाता मंदिराच्या बाजूने बिच्छन नदी वाहायची. तिचा उगम सातपुड्याच्या पर्वतरांगेत होता. ब्रिटीश छावणीतले सैनिक या नदीवर आंघोळ करत. त्यांनंतर ते देवीच्या दर्शनाला जात. छावणीच्या जवळचं हेच त्यांचं एकमेव श्रद्धास्थान. दर्शनवगैरे झाल्यावर ते आपल्या नित्य कामांना लागत.

पूर्वी बाजूला गव्हर्नमेंट फार्म होतं. आता ही जागा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ताब्यात असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. ब्रिटीशांना बाजूला रस्ता काढायचा होता. त्यांनी बिच्छन नदीचा प्रवाह वळवला. पुढे नदीच्या पात्राचा भाग तसाच राहिला. लोकसहभागातून पुढे या पात्रातही अलीकडच्या काळात आमूलाग्र बदल घडवून आणलेत. इंग्रजांनी वळवलेली बिच्छन नदी आता जवळपास अदृष्यच झाली.

वाघाई परिसरात फिरायचे वाघ…………..

ब्रिटीशांच्या छावणीत विविध भागांतले सैनिक होते. त्यामुळे या देवीला वाघाई, वाघामाता, वाघंबा अशा विविध नावांनी बोलावलं जायचं. मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आहे. जवळपास 3 ते 3 एकर इतकी या मंदिराची व्याप्ती आहे. मंदिराचे अध्यक्ष मदनलाल यादव हे तेव्हाच्या विदर्भ मिलमधून रिटायर्ड अधिकारी आहेत.

ते म्हणालेत की, पूर्वी इथे फक्त मातीचाच चबुतरा होता. त्याला पक्त छत नव्हतं. लाकडी खांबांवरती पळसाच्या पानांचं छत, एवढंच मंदिराचं स्वरूप होतं. हा संपूर्ण जंगली परिसर होता. दिवस बुडाल्यावर सहसा कुणी इकडे भटकतदेखील नव्हते. गावातील लोकांनी पुढाकार घेतला. 1962च्या सुमारास माती-विटांनी मंदिराचं बांधकाम झालं.

महादेवाची पिंड आणि भैरवाची मूर्ती आधीच होती. ही भैरवाची मूर्ती सिंहासारखी दिसायची, असं जुने लोक सांगतात. या परिसरात आणि गणपती, हनुमानाची मंदिरं आहेत. मंदिराच्या ट्रस्टींपैकी मुरलीधर चौधरी हे बाजूच्याच गव्हर्नमेंट फार्मवर नोकरीला होते. हेदेखील फार पूर्वीपासूनच या मंदिरात तिथल्यातिथं दर्शनाला जायचे. हा परिसर अत्यंत दाट झाडींचा होता. या भागात काहीवेळा वाघ पाहिल्याचंही चौधरी म्हणाले.

मंदिर झालं आकर्षण

खरं पाहता 1962 नंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं. 1970.72मधे मंदिराचा स्लॅब टाकला. गावातील प्रतिष्ठित मंडळी एकत्रित आलीत. 1985 ला मंदिराची ट्रस्ट रजिस्टर्ड झाली. याच दरम्यान शिवमंदिराचं बांधकाम झालं. माजी आमदार बाबासाहेब भोकरे यांच्या प्रयत्नातून इथं वीज आणि लाईटस् आलेत. हळूहळू लोकांचं मंदिरात येण्याचं प्रमाण वाढायला लागलं. बिच्छन नदीच्या पात्रात आता सुंदर असं ‘वाघामाता उद्यान’ सुरू झालं.

इथल्या जॉगिंग ट्रॅकवर पहाटे जुळ्या शहरातील नागरिक येतात. ओपन जिमचादेखील अनेक नागरिक लाभ घेतात. कधी काळी इथे साप-विंचू निघायचे. आता मात्र संपूर्ण परिसर सुंदर आणि स्वच्छ झालाय. देवीचं सुंदर मंदिर, उद्यान आणि इथला रम्य परिसर सर्वांनाच आकर्षित करतो.

वाघामाता मंदिराचं नव्यानं दगडी बांधकाम झालं. राजस्थान येथील आर्टिस्ट अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात काम करत होते. त्यांनीच इथलं आकर्षक असं बांधकाम केलं. नजिकच्या काळात मंदिराला कव्हर करणारा मोठा सभामंडप बांधण्याचा संस्थेचा मानस आहे.

नवरात्रात एखादं पूजासाहित्याचं दुकान लागायचं. आता या उत्सवाची भव्यता दिवसेंदिवस वाढायला लागली. प्राचार्य राम शेवाळकर सभागृह आणि आखणी एक असे दोन हॉल्स मंदिर परिसरात अलीकडच्या काळात बांधलेत. अनेक सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी हे हॉल्स भाड्याने देतात. गोर-गरिबांच्या लग्नासाठी हे हॉल्स अत्यंत उपयोगी असल्याचं संस्थेनं सांगितलं.

वर्षभर उत्सव आणि उपक्रम

नवरात्र, रामनवमी, एकादशी असे विविध सण आणि उत्सव मंदिरात वर्षभर साजरे केले जातात. दुष्ट प्रवृत्तीचा नायनाट व्हावा म्हणून दसऱ्याला इथं प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं जातं. इथला दसराउत्सव खास असतो. केवळ पंचक्रोषीतीलच नव्हे तर विविध ठिकाणांहून लोक इथं आवर्जून येतात.

शिरजगावहून अश्विन पंचमीला पदयात्रा येते. यात जवळपास 100 ते 200 भाविक सहभाग होतात. विशेष पूजा, भजन-कीर्तन असे अनेक सोहळे या निमित्ताने होतात. या सोहळ्यासाठीदेखील अनेक भक्त हजेरी लावतात. संस्थेचे अध्यक्ष मदनलाल यांनी 2003मधे गार्डनच्या कंपांउंडला मोठाली झालं लावलीत.

आज ती खूप मोठी झाली आहेत. कदंब, शमी, आवळा, कडुलिंब, आंबा, पिंपळ, गुल्लर, जांभूळ, चिंच, बेल असे अनेक वृक्ष आज इथे आहेत. तसेच नियमित वृक्षारोपणदेखील इथं होतं. या झाडांची काळजीदेखील घेतली जाते.

मंदिराची स्वतःची एक गोशाळा आहे. तिथे आज 5 गाई आणि 1 वळू आहे. तसेच नवरात्रात किंवा नियमित भाविक देवीला साडी-खण अर्पण करतात. त्याची प्रसाद म्हणून मंदिरातून विक्री होते. 50 आणि 100 रूपयांत हा साडीचा प्रसाद मिळतो. त्याची रीतसर पावतीदेखील मंदिरातून दिली जाते. मंदिरात वर्षभर दर मंगळवारी मोफत खिचडीवाटप होतं.

2019च्या कार्यकारिणीत अध्यक्ष – मदनलाल रामलालजी यादव, उपायक्ष – पुरणजी किल्लेदार, सचिव – विरेंद्र जिनदासजी उदापूरकर, सहसचिव- बच्चूमल दौलतानी, कोषाध्यक्ष- विनोद नंदलाल चौधरी आहेत. अशोक मिश्रा गुरूजी, प्रदीप दुरगकर, राजू श्रीवास्तव, बिजलसिंग बावरी, दिलीप वाशीमकर, अरुण दीक्षित, वासू गीद, महेंद्र जायदे सदस्य आहेत.

बोकडाचं मग काय झालं !  

इथं प्राण्यांची बळीप्रथा नाही हे विशेष. कधी काळी कोणी नवस वगैरे केलाच तर कोंबडी किंवा बकरी वगैरे इथं आणून सोडतात. संस्थानात असाच कुणीतरी बोकड आणून सोडला. इथे बळी द्यायला तर बंदी आहेच. या बोकडाचं करायचं काय हा प्रश्न पुढे आला. मग मंदिराने तो बोकड पाळला. तो नैसर्गिकरीत्या मेल्यावर त्याला मूठमाती दिली.

श्रद्धा आणि रम्यतेचा संगम 

अचलपूर आणि परतवाडा ही जुळी शहरं. या दोन्ही शहरवासियांना वाघामाता मंदिर हे श्रद्धा आणि रमणियतेसाठी आकर्षित करते. इथलं भव्य उद्यान आणि पाण्याची ‘ग्लोब’वाली टाकी लहान लेकरांसह सर्वांनाच पाहायला आवडते. नवरात्रानिमित्त विविध कार्यक्रम इथे आहेत. या स्थळाला अनेकजण नियमित भेट देतात. या वर्षी नवरात्रांत साधंच झालं.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.