भीमजयंतीनिमित्त वणीत अभिवादन मॅराथान दौड
बंटी तामगाडगे, वणी: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 14 एप्रिल 2018 ला वणीत अभिवादन मॅराथॉन दौडचे आयोजन करण्यात आले आहे. वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून सकाळी 6 वाजता या मॅराथॉन दौडला सुरूवात होणार आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक इथे या दौडची सांगता होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी आर्थिक सामाजिक व शैक्षणिक उत्थानासाठी भारतीय घटनेमध्ये तरतूद करून आपले नैतिक उत्तरदायित्व पूर्ण केले. त्याच्या या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची जयंती आगळ्या वेगळ्या स्वरूपात साजरी करता यावी या उद्धेशने ओबीसी परिषद वणीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
ही दौड छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होणार असून खाती चौक, महात्मा गांधी चौक, गाडगे बाबा चौक, भगतसिंग चौक, टागोर चौक असा प्रवास करत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपणार आहे. तिथे अभिवादन केल्यानंतर पहिल्या पाच महिला आणि पाच पुरुष गटातील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.
या दौडच्या समारोपीय कार्यक्रमाला वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, वणीचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे, क्रीडा प्रशिक्षक प्रा. दिलीप मालेकर यांची उपस्थिती राहणार आहे. या दौडमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अखिल सातोकर, प्रवीण खानझोडे. सिद्दीक रंगरेज व ओबीसी परिषदेचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.